तब्बल 15 वर्ष रखडलेला धारावीच्या पुनर्विकासाचा महाकाय प्रोजेक्ट (dharavi redevelopment project ) गौतम अदानी यांनी पूर्ण करण्याचे धाडस दाखवले आहे. यापूर्वी तीनवेळा राज्य सरकारने धारावी रिडेव्हलपमेंटसाठी टेंडर काढले होते. मात्र या प्रकल्पाची गुंतागुंत लक्षात घेता अनेक बड्या डेव्हलपर्सने या टेंडरकडे पाठ फिरवली होती.अखेर गौतम अदानी यांच्या 'अदानी रियल्टी' या कंपनीने सर्वाधिक बोली लावत धारावी पुनर्विकासाचे नवे टेंडर जिंकले. तब्बल 600 एकरांवर पसरलेली धारावी आणि त्यातील 55 हजारांहून अधिक मालमत्ताधारक/गाळेधारक, 10 ते 12 हजार छोटे-मोठे व्यावसायिक यांचे पुनर्वसन करताना अदानी रियल्टी आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांना तारेवरची कसरत करावी लागेल. (dharavi redevelopment latest news )
अदानी रियल्टी 34 वर्षांपासून स्थावर मालमत्ता क्षेत्रात कार्यरत आहे. मागील 10 वर्षात अदानी रियल्टीने मुंबई आणि उपनगरात अनेक निवासी प्रकल्प विकसित केले आहेत. त्याशिवाय पुणे, अहमदाबाद, कोची, गुडगांवमध्ये कंपनीचे इन्फ्रा आणि रेसिडेंशिअल प्रोजेक्ट्स आहेत. धारावी पुनर्विकासासाठी राज्य सरकारकडून स्पेशल पर्जज व्हेईकल (SPV) अर्थात विशेष उद्देश वहन कंपनी स्थापन केली जाण्याची शक्यता आहे. अदानी रियल्टी आणि एसआरए ऑथोरिटी या कंपनीचे भागीदार असतील, असे बोलले जाते.
तीन महिन्यांपूर्वी अदानी रियल्टीकडून डी.बी रियल्टी या कंपनीला ताब्यात घेण्याच्या चर्चा होती. मात्र हा व्यवहार अद्याप पूर्ण झालेला नाही. धारावीसारख्या मोठया प्रोजक्टला पूर्ण करण्यासाठी अदानी रियल्टीला मुंबईतील बांधकाम क्षेत्रातल्या अनुभवी कंपनीची मदत लागू शकते. त्यामुळे धारावी रिडेव्हलपमेंटच्या टेंडरच्या निमित्ताने पुन्हा हा विषय चर्चेत येण्याची शक्यता आहे.
धारावीत 56000 हून अधिक कुटुंबांचे पुनर्वसन करणे हे या प्रोजेक्टचे सर्वात मोठे आव्हान आहे. या कुटुंबियांना पुनर्विकासात 405 क्षेत्रफळाचे नवे घर मिळणार आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी 4 एफएसआय (4 FSI for Dharavi Redevelopment) मंजूर करण्यात आला आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा सुमारे 20 हजार कोटींचा असून मोठी गुंतवणूक या प्रकल्पात होणार आहे. येत्या 17 वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारचे आहे.आगामी सात वर्षात इथल्या रहिवाश्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे.
अदानी रियल्टी निधी कसा उभारणार
अदानी समुहाने धारावी पुनर्विकासाच्या निविदेत 5069 कोटी रुपयांची बोली लावली. ही बोली सर्वाधिक ठरली आहे. अदानी रियल्टीकडून या जम्बो प्रोजेक्टसाठी पैसा उभारण्यासाठी IPO चा पर्याय खुला आहे. अदानी समूहाच्या सध्या सात कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत. त्याचबरोबर अदानी रियल्टी कर्ज घेऊन या प्रकल्पाला सुरुवात करु शकते. या प्रोजेक्टचे महत्व पाहता यासाठी कर्ज उभारणे फारसे कठिण जाणार नाही.
एक कोटी चौरस फूट बांधकाम होण्याची शक्यता
धारावी पुनर्विकासात किमान एक कोटी चौरस फूट क्षेत्रफळाचे बांधकाम होण्याची शक्यता आहे. त्यापैकी 70 ते 80 लाख चौरस फूट बांधकाम स्थानिकांना वापरता येणार आहे. धारावीची लोकसंख्या 10 लाखांच्या आसपास आहे. इथल्या गल्लीबोळांमध्ये चामड्याच्या वस्तू, तयार खाद्यपदार्थ, प्लास्टिक वस्तू, तयार कपड्यांचे कारखाने वसलेले आहेत. यात लाखो कामगार काम करतात.त्याशिवाय धारावी मुंबई शहराच्या मध्यभागी वसलेली आहे. शेजारी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आहे. याच ठिकाणी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट सुरु आहे. धारावीचा पुनर्विकास झाल्यानंतर या परिसराचा आणि मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहे. त्यामुळे पुनर्विकास करणाऱ्या कंपनीला देखील प्रचंड कमाई करण्याची संधी निर्माण होणार आहे.
कोव्हीड काळात चर्चेत आलेले धारावी मॉडेल
धारावीतील प्रचंड लोकसंख्येमुळे हा भाग कोव्हीड काळात हायअॅलर्टवर होता. मुंबई महापालिकेने येथे राबवलेल्या विशेष मोहीमेमुळे धारावीत कोव्हीडचा मर्यादित परिणाम झाला. पुढे धारावी मॉडेलची (Dharavi Model) वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेनने दखल घेतली होती. डब्ल्यूएचओने धारावी मॉडलचे कौतुक केले होते.