Waayu app: फूड डिलिव्हरी व्यवसायात स्विगी आणि झोमॅटो या दोन कंपन्यांनी आपला चांगलाच जम बसवला आहे. अशातच केंद्र सरकारने देखील ऑनलाईन फूड डिलिव्हरी उपलब्ध करून देण्यासाठी आणि ई-कॉमर्समधील ठराविक कंपन्यांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी ONDC म्हणजेच Open Network for Digital Commerce ची सुरुवात केली आहे. अशातच चित्रपट अभिनेते सुनील शेट्टी यांनी देखील एक फूड डिलिव्हरी अॅप लॉन्च केलं असून, स्विगी आणि झोमॅटोसमोर यामुळे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
मुंबईतून सुरुवात
Waayu हे फूड डिलिव्हरी अॅपला मुंबईतून सुरुवात करण्यात आली आहे. ‘वायू’ च्या अधिकृत वेबसाईटनुसार हे अॅपवर सध्या मुंबईतील शंभराहून अधिक हॉटेल्स ऑनबोर्ड झाले आहेत. पुढील टप्प्यात ठाणे,पालघर, मीरा भाईंदर, नवी मुंबई,पुणे या शहरांत देखील ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
Waayu app वर स्विगी आणि झोमॅटोच्या तुलनेत अधिक स्वस्त दरात जेवण ऑर्डर करता येणार आहे. ‘इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने’ हे अॅप लॉन्च केले आहे. इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ही देशभरातील हॉटेल व्यावसायिकांची संघटना आहे. स्विगी, झोमॅटो आणि तत्सम फूड डिलिव्हरी अॅपमुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत होते, आता मात्र त्यांच्या अडचणी कमी होण्याचो चिन्हे आहेत.
Grand entry of superstar @SunielVShetty sir during the event of @WAAYU_App ! #Sunielshetty #WaayuApp #BrandAmbassador pic.twitter.com/qFD2xkUnuJ
— Dalpat Razzpurohit (@DalpatSunielian) May 10, 2023
अभिनेता सुनील शेट्टी या अॅपचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे आणि त्याच्याकडे देखील इक्विटी आहे. माध्यमांशी बोलताना सुनील शेट्टी म्हणाले की, Waayu app मुळे ऑनलाईन फूड डिलिव्हरी व्यवसायात बदल होऊ शकतात. आम्ही कुठलेही कमिशन न घेता ग्राहकांना खाद्यान्न पुरवणार आहोत. चांगल्या प्रयोगांना आपण पाठींबा दिला पाहिजे असे मला वाटते, म्हणून मी या प्रकल्पाचा भाग बनलो आहे.
स्विगी झोमॅटोचे गणित बिघडणार!
जेव्हा तुम्ही स्विगी किंवा झोमॅटो वरून खाद्यपदार्थ मागवता तेव्हा तिथे खाद्यपदार्थांची किंमत एकतर रेस्टॉरंटपेक्षा जास्त असते किंवा ऑर्डर केलेल्या खाद्यान्नाची क्वांटीटी कमी असते. याचे मुख्य कारण म्हणजे स्विगी आणि झोमॅटो कंपन्या रेस्टॉरंट्सला त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ऑनबोर्ड करण्याच्या बदल्यात कमिशन घेत असतात. या कंपन्यांना दिलेल्या कमिशनची भरपाई करण्यासाठी हॉटेल मालक एक तर खाद्यान्नाचे शुल्क वाढवतात किंवा खाद्यान्नाची क्वांटीटी कमी करतात.
वायु अॅप मात्र कुठल्याही कमिशन शिवाय ग्राहकांना फूड डिलिव्हरी करणार आहे. ग्राहक UPI पेमेंटद्वारे खाद्य मागवू शकतात, पैसे भरल्यानंतर वायू अॅप रेस्टॉरंटमध्ये पैसे त्वरित हस्तांतरित करेल, त्यासोबतच ग्राहकांची माहिती देखील हॉटेलसोबत शेअर केली जाईल. हॉटेल्स त्यांच्या सवडीनुसार स्वतःची वितरण व्यवस्था राबवू शकतात किंवा रेस्टॉरंट्स ग्रॅब डिलिव्हरी सर्व्हिस, डन्झो आणि इतर डिलिव्हरी कंपन्यांचे देखील सहकार्य घेऊ शकतात.