सध्या डिजिटल पेमेंट करणे ही काही नवी बाब राहिली नाहीये. आज काल आपण सगळेच डिजिटल पेमेंट मोड वापरतो आहोत. तुम्ही डिजिटल पेमेंटसाठी Google Pay प्लॅटफॉर्म जर वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आलीये. Google Pay ने त्यांच्या यूजर्ससाठी एक खास फीचर लाँच केले आहे.
नव्या फीचरनुसार वापरकर्ते आता डेबिट कार्डशिवाय देखील त्यांचे UPI खाते ॲक्टीवेट करू शकणार आहेत. डेबिट कार्ड ऐवजी केवळ आधार कार्डच्या सहाय्याने ग्राहकांना त्यांचे Google Pay खाते सुरु करता येणार आहे. तुम्हांला माहितीच असेल की याआधी Google Pay खाते सुरु करण्यासाठी ग्राहकांना बँक खात्याचे डीटेल्स आणि डेबिट कार्डची माहिती द्यावी लागत होती. डेबिट कार्डच्या माहितीशिवाय ग्राहकांना गुगल पे सेवेचा वापर करता येत नव्हता. आता मात्र ग्राहकांना केवळ आधार कार्डाच्या माध्यमातून त्यांचे गुगल पे खाते सुरु करता येणार आहे. चला तर जाणून घेऊया नेमके हे फिचर काय आहे आणि कसे काम करेल?
या सेवेअंतर्गत, Google Pay वापरकर्ते डेबिट कार्डशिवाय UPI पिन तयार करू शकतील. मात्र, गुगल पे युजर्सला त्यांचा मोबाईल फोन नंबर, बँक खात्याची माहिती आणि आधार कार्डाचा क्रमांक लिंक झाल्यावरच ते या सेवेचा लाभ घेऊ शकणार आहेत. यासाठी आवश्यक गोष्ट म्हणजे ग्राहकांचा मोबाईल नंबर आधार कार्डाशी लिंक असायला हवा.
कसे वापराल हे फिचर?
आधारवरून UPI सेवा सुरु करण्यासाठी, गुगल पे युजर्सकडे बँक खात्याला आणि आधार कार्डला लिंक केलेला मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. तसे नसल्यास युजर्सला गुगल पे खाते सुरु करता येणार नाहीये हे लक्षात घ्या. आधार कार्डाच्या सहाय्याने खालील स्टेप्स फॉलो करून तुम्ही Google Pay UPI सुरु करू शकाल.
- आधी तुमचे Google Pay अॅप उघडा.
- त्यांनतर ‘UPI Onboard’ पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर तुमच्या आधार कार्डाचे शेवटचे 6 अंक टाका.
- यानंतर यूजर्सला वन टाइम पासवर्ड (OTP) त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठवला जाईल. हा OTP समाविष्ट केल्यानंतर गुगल पे तुमच्या बँक खात्याला ऑथेंटिकेट करेल.
- यानंतर ग्राहकांचे UPI पेमेंट सक्रिय होईल.
- यानंतर यूजर्सला UPI पिन सेट करावा लागेल.
- UPI सक्रिय झाल्यानंतर, वापरकर्ते गुगल पे वापरून त्यांचे आर्थिक व्यवहार करू शकतील.
या नवीन फीचरनुसार UPI पिन तयार करण्यासाठी ग्राहकांना डेबिट कार्डाची आवश्यकता भासणार नाहीये. UPI चे लाखो वापरकर्ते आता केवळ आधार कार्डच्या सहाय्याने UPI पिन तयार करू शकणार आहेत असे कंपनीने म्हटले आहे. सामान्य ग्राहकांना UPI वापरताना सुलभता यावी यासाठी हा प्रयत्न असल्याचे देखील कंपनीने म्हटले आहे.