JK Family ID: जम्मू-काश्मीरमधील सर्व कुटुंबांचा डेटाबेस तयार करण्यासाठी जम्मू-काश्मीर सरकारने हरियाणा सरकारसोबत एक सामंजस्य करार केला आहे. या अंतर्गत हरियाणा सरकार आपला अनुभव जम्मू-काश्मीर प्रशासनासोबत शेअर करणार आहे. जम्मू-काश्मीरमधील सर्व कुटुंबांचा डेटाबेस तयार करण्याची तयारी सुरू झाली असून त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी एक विशिष्ट कोड देण्यात येणार आहे. या कोडच्या मदतीने विविध सामाजिक सुरक्षा योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा डेटाबेस तयार झाल्यानंतर लोकांना सरकारच्या योजनांतर्गत लाभ घेण्यासाठी वेगळे अर्ज करण्याची गरज भासणार नाही. याशिवाय आधार कार्ड, मतदार ओळखपत्र यांसारख्या शासकीय कागदपत्रांची गरज ही त्यांना भासणार नाही. चला तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
JK Family ID म्हणजे काय?
जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला एक न्युमरिक युनिक कोड दिला जाणार आहे. याच कोडला ‘JK Family ID’ म्हटले जाईल. या कोडमध्ये इंग्रजी अक्षरांचा आणि अंकाचा वापर केला जाईल.
लोकांना काही कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत का?
डेटाबेसमधील माहितीचे प्रमाणीकरण आणि पडताळणी झाल्यानंतर, लाभार्थ्याला कोणत्याही सेवेचा लाभ घेण्यासाठी इतर कोणतेही कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता भासणार नाही.
डेटाबेसमधून लाभार्थ्यांची ओळख कशा प्रकारे होईल?
कुटुंबाच्या या उपलब्ध डेटाचा वापर सामाजिक फायद्यांसाठी आणि लाभार्थी ओळखण्यासाठी केला जाईल. हे ऑटेमेटिक सिलेक्शनच्या माध्यमातून केले जाईल.
हा डेटा सुरक्षित राहील का?
डेटाबेसच्या मदतीने जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक कुटुंबाची ओळख पटवण्यात येईल. प्रत्येक कुटुंबाच्या सहमतीने त्यांचा डेटा डिजिटल स्वरूपात संकलित केला जाईल तसेच संवेदनशील डेटाचे रक्षण करण्यासाठी जम्मू-काश्मीर सरकार माहिती सुरक्षा धोरणावर काम करेल.