Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tata group : टाटा ग्रुपचा नवा विक्रम, वर्षभराच्या कालावधीत कमावले 10 लाख कोटी!

Tata group : टाटा ग्रुपचा नवा विक्रम, वर्षभराच्या कालावधीत कमावले 10 लाख कोटी!

Tata group : टाटा ग्रुपनं एक अनोखा विक्रम आपल्या नावे केलाय. एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत ग्रुपनं तब्बल 10 लाख कोटी रुपयांचा महसूल कमावलाय. यानिमित्तानं वर्षभराच्या कालावधीत अशाप्रकारे विक्रमी महसूल मिळवणारा टाटा ग्रुप हा पहिलाच गट ठरलाय. तसंच यात मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 15 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आलीय.

टाटा ग्रुप नेहमीच आपल्या वेगळेपणामुळे ओळखला जातो. ग्राहकांना अनुकूल आणि परवडणारी अशी उत्पादनं ही टाटा ग्रुपचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच ग्राहकही टाटा ग्रुपच्या उत्पादनांना सकारात्मक प्रतिसाद देतात. या सर्वांचा परिणाम टाटा ग्रुपच्या महसुलावर (Revenue) होतो. आता टाटा ग्रुपनं यात विक्रमच केलाय. एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत कोणत्याही समुहाला सहज शक्य होणार नाही, असा विक्रम टाटा समुहानं केलाय. 10 लाख कोटींचा महसूल जमा करण्यात आलाय. ही एका आर्थिक वर्षातली कामगिरी आहे.

टीसीएसचं नाव नाही

त्रैमासिक आढावा घेतल्यास टाटा ग्रुपमधली टाटा मोटर्स ही आपल्या समुहातल्या इतर कंपन्यांना मागे टाकत घोडदौड करत आहे. 1 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळवून ती देशातली आठव्या क्रमांकाची कंपनी ठरलीय. तर समुहातल्या सर्वात मोठ्या असलेल्या टीसीएसचं नाव मात्र या यादीत नाही. टाटा ग्रुपमधल्या कंपन्यांनी नेमका किती महसूल गोळा केला, याविषयी सविस्तर पाहूया...

कंपन्यांच्या महसुलाची टक्केवारी

टाटा ग्रुपच्या 14 कंपन्या लिस्टेड आहेत. यात टाटा सन्सचं थेट भागभांडवल आहे. आर्थिक वर्ष 2023मध्ये 10.07 ट्रिलियन रुपयांची कमाईही करण्यात यश मिळवलंय. मागच्या वर्षी म्हणजेच आर्थिक वर्ष 2022मध्ये, महसुलाचा हा आकडा 8.73 ट्रिलियन रुपये होता. म्हणजेट गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा त्यात 15.3 टक्क्यांची वाढ झालीय. या कंपन्यांना मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत कमी संयुक्त नफा पाहायला मिळालाय. आकडेवारीवरून ही बाब लक्षात येईल. आर्थिक वर्ष 2023मध्ये नफा जवळपास 66,670 कोटी रुपये इतका होता. तोच आर्थिक वर्ष 2022मध्ये 74,540 कोटी रुपये नोंदवण्यात आला होता. म्हणजेच 10.6 टक्क्यांनी यात घट झाली. यावर्षी टाटा स्टीलनं चांगली कामगिरी केली. या मजबूत कामगिरीमुळे नफ्यात 156 कोटी रुपयांची वाढ झालीय.

टाटा मोटर्सनं करून दाखवलं!

ग्रुपमधल्या टाटा मोटर्स कंपनीनंही विक्रम केलाय. ग्रुपमधली कोणतीही कंपनी हा विक्रम करू शकलेली नाही. टीसीएस ही सर्वात मोठी कंपनी आहे. मात्र तिलादेखील हे जमलेलं नाही. आकडेवारीवर नजर टाकल्यास, आर्थिक वर्ष 2023च्या चौथ्या तिमाहीत टाटा ग्रुपचा महसूल 105,932 कोटी रुपयांवर पोहोचलाय. देशातली सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टीसीएसचा महसूल 59,162 कोटी रुपये इतका होता. त्यामुळे एका आर्थिक वर्षात 1 लाख कोटी रुपयांचा महसूल पार करणारी टाटा मोटर्स ही टाटा ग्रुपमधली पहिलीच कंपनी ठरलीय.

ग्रुपमधून पहिली अन् देशात आठवा

टाटा मोटर्सनं 1 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळवला. ही 1 लाख कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा गाठणारी देशातली 8वी दुसरी खासगी आणि एकूण 8वी कंपनी ठरलीय. सीएनबीसीच्या वृ्त्तानुसार, सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, एलआयसी (LIC), ओएनजीसी (ONGC), बीपीसीएल (BPCL) आणि एचपीसीएल (HPCL) या कंपन्यांमधला महसूल 1 लाख कोटींपेक्षा जास्त आहे. त्रैमासिक आधारावरची ही आकडेवारी आहे. सध्या टाटा ग्रुपच्या सर्व लहान-मोठ्या कंपन्यांचा एक युनिट मानला तर 125 अब्ज डॉलरचा महसूल मिळतोय. यामुळे हा एक जगातला 64वा सर्वात मोठा ग्रुप बनला आहे.