आतापर्यंतची सर्वात वेगवान दूरसंचार सेवा 5G मधून उपलब्ध होणार आहे. (5G Spectrum Auction 2022) त्यामुळे 5G च्या लिलावाला सर्वच प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. यात मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ या कंपनीनं आक्रमक बोली लावत महत्वाच्या स्पेक्ट्रमवर हक्क मिळवला. त्यापाठोपाठ भारती एअरटेल, वोडाफोन आयडिया यांनी 5G एअरवेजसाठी बोली लावली. दूरसंचार क्षेत्रात नव्याने आपली दावेदारी सांगणाऱ्या अदानी डेटानेटवर्कने देखील 26 गिगाहर्ट्झ श्रेणीतील 5G स्पेक्ट्रमसाठी बोली लावली.
लिलावातील बोली पाहता रिलायन्स जिओने 5G स्पेक्ट्रम खरेदीसाठी तब्बल 84,500 कोटी खर्च केले असल्याचे बोलले जाते. एअरटेलने 46,500 कोटी खर्च केले आहेत. आर्थिक संकटात असलेल्या वोडाफोनने देखील 5G स्पर्धेत टिकण्यासाठी जिवाची बाजी लावल्याचे दिसून आले. वोडाफोनने 5G स्पेक्ट्रमसाठी जवळपास 18,500 कोटींचा खर्च केला आहे. अदानी डेटा नेटवर्ककडून 800 ते 900 कोटींची बोली लावण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सरकारकडून 5G स्पेक्ट्रम लिलावाचा संपूर्ण तपशील लवकरच जाहीर केला जाणार आहे.
उत्तर प्रदेशातील स्पेक्ट्रमसाठी चांगली बोली लागली. पूर्व उत्तर प्रदेशातील 1800 मेगाहर्ट्झसाठी 91 कोटींची किमान किंमत निश्चित करण्यात आली होती मात्र लिलावात यासाठी 160.57 कोटींचा भाव मिळाला.
5G स्पेक्ट्रममुळे दूरसंचार क्षेत्राला तरतरी
कोरोना संकटाने मरगळलेली अर्थव्यवस्था आता हळुहळू पूर्वपदावर येत आहे. आज झालेल्या 5G स्पेक्ट्रममुळे दूरसंचार क्षेत्राला देखील नवीन ऊर्जा मिळाली आहे. केंद्र सरकारसाठी 5G स्पेक्ट्रम लिलाव महसुलाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा होता. मागील तीन वर्ष केंद्र सरकारला निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अपयश आले होते. 5G स्पेक्ट्रम लिलावाला मिळालेला भरघोस प्रतिसाद पाहता केंद्र सरकारचा आत्मविश्वास दुणावला आहे. यामुळे इतर सरकारी कंपन्यांमधील निर्गुंतवणूक योजनेला चांगला प्रतिसाद मिळेल, असे वातावरण तयार झाले आहे.
टेलिकॉम कंपन्यांचे शेअर वधारले
5G सेवा लवकरच सुरु करणाऱ्या टेलिकॉम शेअर्समध्ये आज तेजी दिसून आली. रिलायन्स इंडस्ट्रीज 2.3%, भारती एअरटेल 1.4% , वोडाफोन 2.5% वधारले. त्याचबरोबर अदानी एंटरप्राईसेसचा शेअर 2.5% वधारला.