Cybersecurity jobs: टेक्नॉलॉजी क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. दर सहा महिन्यांनी नवे तंत्रज्ञान किंवा त्यासंबंधी अपडेट बाजारात येत आहेत. कोरोनानंतर विविध क्षेत्रात तंत्रज्ञानाने शिरकाव केला. दरम्यान, टेक्नोलॉजीच्या प्रगतीबरोबरच सायबर सिक्युरिटीचाही धोका वाढत आहे. बँका, मल्टिनॅशनल कंपन्या, सरकारी संकेतस्थळे, डेटाबेस वेअरहाऊसेस यांच्याकडे कोट्यवधी नागरिकांचा संवेदनशील डेटा असतो. हा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील नोकऱ्यांची संधी वाढत आहे.
40 हजार नोकऱ्या उपलब्ध
भारतामध्ये सध्या सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील विविध पदांच्या 40 हजार नोकऱ्या उपलब्ध आहेत, असे TeamLease Digital या कंपनीने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे. सध्या सायबर सिक्युरिटी क्षेत्रात जे मनुष्यबळ उपलब्ध आहे ते पुरसे नाही. कौशल्याधारित कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील कौशल्य आत्मसात करून या नोकरीच्या संधी तरुण पदरात पाडून घेऊ शकतात. तसेच अनुभवी कर्मचारीही या संधी मिळवू शकतात.
मनुष्यबळाची कमतरता
सायबर सिक्युरिटीचे काम पाहण्यासाठी कंपन्यांना कौशल्याधारित मनुष्यबळ मिळत नाही. मागणी आणि पुरवठ्यात 30% तफावत आहे. त्यामुळे जे कर्मचारी काम करत आहेत त्यांच्यावर अधिकची जबाबदारी पडत आहे. 40 हजार जॉब उपलब्ध असल्याची आकडेवारी मे महिन्यातील आहे. भारतातील डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर सुरक्षित ठेवण्यासाठी सायबर सिक्युरिटी क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावते. सोबतच अनेक भारतीय कंपन्या युरोप, अमेरिका आणि एशियन कंपन्यांना सायबर सुरक्षा संबंधित सेवा पुरवतात.
सायबर क्षेत्रातील ट्रेंडिग जॉब
आयटी ऑथर
इन्फॉर्मेशन सिक्युरीटी अॅनालिस्ट
नेटवर्क इंजिनिअर/स्पेशालिस्ट
सिक्युरिटी टेस्टिंग/पेनिटरेशन टेस्टर
कॉम्प्युटर फॉरेन्सिक अॅनालिस्ट
सायबर/ क्लाउड सिक्युरिटी आर्किटेक्ट
इन्फॉर्मेशन सिक्युरिटी
चिफ इन्फॉर्मेशन ऑफिसर
सायबर सिक्युरिटी संबंधी विविध कोर्सेस बाजारात उपलब्ध आहेत. तीन ते सहा महिन्यांपासून एक वर्ष आणि दोन वर्षांचे डिप्लोमा कोर्सेस देखील आहेत. सायबर सिक्युरीटीमध्ये पदवी किंवा मास्टर्सचे पर्याय देखील उपलब्ध आहेत.
सायबर सिक्युरिटी क्षेत्रात सरासरी पगार किती?
सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील फ्रेशर्सला विविध पदासाठी 3 ते 9 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळू शकते. 3 ते 5 वर्ष अनुभव असल्यास पगार 9 ते 12 लाख रुपयापर्यंत मिळू शकतो. 5 ते 8 वर्ष अनुभव असणाऱ्यांना 12 ते 18 लाख रुपये वार्षिक पगार मिळू शकतो. यापेक्षा जास्त अनुभव असणाऱ्यांचे वार्षिक पॅकेज 30 लाखांपेक्षाही जास्त असू शकते. उमेदवाराची कौशल्ये आणि अनुभव पाहून पगार कमी जास्त मिळू शकतो. वरील आकडेवारी सरासरी अंदाज आहे.