गेल्या आठवड्यात रिझर्व बँक ऑफ इंडियाने एक अधिसूचना जारी करत 2000 रुपयांच्या नोटा यापुढे चलनातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. 2000 रुपयांच्या नोटांना येत्या 30 सप्टेंबरपर्यंत आरबीआयच्या विभागीय कार्यालयांमध्ये आणि बँकांमध्ये नागरिकांना बदलून घेता येणार आहेत आणि त्यांच्या बँक खात्यात जमा देखील करणार आहेत. मुख्य म्हणजे 30 सप्टेंबरनंतर देखील 2000 रुपयांच्या नोटांना कायदेशीर चलन म्हणून मान्यता असणार आहे. अशातच पोस्ट ऑफिसमध्ये नोटा बदलून घेण्यासाठी सामान्य नागरिकांनी रांगा लावल्यामुळे इंडियन पोस्ट ऑफिसला एक स्वतंत्र निवेदन जारी करावे लागले आहे.
पोस्टात नोटा बदलता येणार नाहीत
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिसूचनेनंतर पोस्ट खात्याने एक निवेदन जारी केले असून पोस्टात 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार नाहीत हे स्पष्ट केले आहे. ज्या नागरिकांना नोटा बदलायच्या असतील त्यांनी नजीकच्या बँकेत जाऊन नोटा बदलून घ्याव्यात असे म्हटले आहे. मात्र इंडियन पोस्टाच्या वेगवगेळ्या योजनांमध्ये गुंतवणूक केलेल्या नागरिकांना 2,000 रुपयांच्या नोटा देऊन व्यवहार मात्र करता येणार आहेत. तसेच पोस्टल व्यवहारासाठी देखील नागरिक 2,000 रुपयांच्या नोटा पोस्टात देऊ शकतात असेही म्हटले आहे.
नोटा स्वीकारण्यास नकार देता येणार नाही
देशभरातील अनेक पोस्ट ऑफीसमध्ये 2000 च्या नोटा बदलण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या. आरबीआयची अधिसूचना पूर्णपणे न वाचल्यामुळे अनेकांचा गोधळ उडाला होता. यावर अनेकांनी इंडियन पोस्टाकडे ऑनलाईन तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत पोस्टाने हे स्पष्ट केले आहे की कुठल्याही पोस्ट ऑफिसमध्ये नोटा बदलता येणार नाहीत मात्र 2000 च्या नोटा देऊन व्यवहार करता येतील आणि खात्यांमध्ये जमा देखील करता येतील.
As per instructions, Rs 2000/- denomination banknotes will not be accepted for exchange in post office. However. acceptance of Rs 2000 denomination banknotes will not be refused for any postal transactions in post offices. Thank you.
— India Post (@IndiaPostOffice) May 24, 2023
अनेक पोस्ट ऑफिस 2000 च्या नोटा जमा करून घेत नसल्याच्या तक्रारी देखील इंडियन पोस्ट ऑफिसला प्राप्त झाल्या होत्या. याबाबत स्पष्टता देताना पोस्टाने म्हटले आहे की देशातील कुठल्याही पोस्ट कार्यालयाला 2000 च्या नोटा जमा करून घेण्यास मनाई करता येणार नाही.
KYC ची गरज
पोस्ट ऑफीसमध्ये केवळ पैशांचा भरणा होऊ शकतो हे आता स्पष्ट झाले आहे. पोस्टातील जन-धन योजनेत, बचत खात्यात, सुकन्या समृद्धी योजना आदि योजनांमध्ये नागरिकांना पैसे जमा करता येणार आहेत. परंतु त्या-त्या योजनेची रक्कम जमा करण्याची मर्यादा आधीसारखीच लागू असणार आहे असे रिझर्व बँक ऑफ इंडियाने याआधीच जाहीर केले होते. तसेच ज्या खातेधारकांची KYC प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही त्यांना केवायसी कागदपत्रे सादर करणे देखील बंधनकारक असणार आहे.