Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

2000 Note: पेट्रोल पंपावर 2000 रुपयांची नोट वापराल तर पॅनकार्ड द्यावे लागेल? पेट्रोल पंप डिलर्सची सावध भूमिका

2000 Note

Image Source : www.telegraphindia.com

2000 Note: रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र 30 सप्टेंबर 2023 पर्यंत ही नोट चलनात आर्थिक व्यवहारांसाठी वैध राहणार आहे. यामुळे ज्या नागरिकांकडे 2000 रुपयांची नोट आहे त्यांना बँकेतून बदलून घेता येईल किंवा ती खर्च केली तर ती वैध राहणार आहे.

रिझर्व्ह बँकेने 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केल्यानंतर पंप चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 2016 मध्ये पंप चालकांच्या मागे लागलेला इन्कम टॅक्सचा ससेमिरा टाळण्यासाठी पंप चालकांच्या संघटनेने सावध भूमिका घेतली आहे.जे ग्राहक 2000 रुपये नोट इंधन खरेदीसाठी वापरतील तर त्यांना पॅनकार्डचा तपशील द्यावा लागण्याची शक्यता आहे. (Petrol Pump Dealers may ask pan card from customer for using 2000 currency note)

केंद्र सरकारने 2016 मध्ये केलेल्या नोटबंदीवेळी पेट्रोल पंप चालकांकडे प्रचंड प्रमाणात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा जमा झाल्या होत्या.या चलनी नोटा बँकेत जमा केल्यानंतर अनेक पंप चालकांना इन्कम टॅक्सच्या नोटीस आल्याचे फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांनी 'महामनी'शी बोलताना सांगितले. (Federation of All Maharashtra Petrol Dealers Association President Uday Lodh)

गेल्या नोटबंदीवेळी नागरिकांनी पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात 500 आणि 1000 रुपयांच्या चलनी नोटा खर्च करुन इंधन खरेदी केली होती. पुढे ही कॅश बँकेत जमा केल्यानंतर पंप चालकांना इन्कम टॅक्स नोटीस आली होती. त्यातील काहीजण आजही या प्रकरणात अडकले असल्याचे लोध यांनी सांगितले. या नोटिशीला उत्तर देताना वकील नेमणे आणि त्यावर पाठपुरावा करण्यासाठी पंप चालकांवर अतिरिक्त खर्चाचा भार सोसावा लागला होता, असे त्यांनी सांगितले.

यातून बोध घेत फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर असोसिएशनने कालच्या नोटबंदीच्या घोषणेबाबत सावध भूमिका घेतली आहे. ग्राहकांनी दिलेली 2000 रुपयांची नोट स्वीकारण्यास पंप चालकांची हरकत नाही, मात्र पुढे बँकेत जमा करताना पंप चालक इन्कम टॅक्सच्या कचाट्यात सापडू नये, यासाठी पंप चालकांनी 2000 रुपयांच्या चलनी नोटा देणाऱ्या ग्राहकांचे पॅनकार्डचा तपशील घेण्याचा विचार केला असल्याचे उदय लोध यांनी सांगितले. यासंदर्भात राज्यभरातील पेट्रोल पंप डिलर्सचे म्हणणे ऐकून प्रस्ताव तयार केला आहे. कायदेशील सल्ला घेऊन हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात येईल, असे उदय लोध यांनी सांगितले.  

रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र 30 सप्टेंबर 2023 पर्यंत ही नोट चलनात आर्थिक व्यवहारांसाठी वैध राहणार आहे. यामुळे ज्या नागरिकांकडे 2000 रुपयांची नोट आहे त्यांना बँकेतून बदलून घेता येईल किंवा ती खर्च केली तर ती वैध राहणार आहे. त्यामुळे नोटा बँकेत बदलून घेण्याऐवजी या नोटा खर्च करण्याकडे नागरिकांचा कल राहण्याची शक्यता लोध यांनी व्यक्त केली.

ग्राहकांनी केवळ 2000 रुपयांची नोट बदलण्यासाठी पेट्रोल पंपावर केवळ 100 रुपयांचे इंधन खरेदी न करता किमान ते 1000 रुपयांची खरेदी करावी तर पंप चालक सुद्धा 2000 रुपयांची नोट स्वीकारतील आणि वादाचे खटके उडणार नाही, असे आवाहन लोध यांनी केले. राज्यात फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर असोसिएशनचे 4500 पंप चालक सदस्य आहे.

रिझर्व्ह बँकेने नागरिकाला एका दिवशी 2000 रुपयांच्या 10 नोटा बँकेतून बदलण्याचे निर्देश दिले आहेत. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत कोणत्याही बँकांमध्ये दोन हजारांची नोट बदलता येईल, असे आरबीआयने म्हटले आहे.