भारतीय संघाचा स्टार गोलंदाज दीपक चहरची (cricketer Deepak Chahar) पत्नी जया हिच्यासोबत 10 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. वृत्तानुसार, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या एका माजी अधिकाऱ्याने ही फसवणूक केली आहे. दीपक चहरच्या वडिलांनीही माजी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. हे पैसे एका करारासाठी दिले होते, मात्र पैसे परत मागितल्यावर क्रिकेट असोसिएशनच्या माजी अधिकाऱ्याने शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली.
एफआयआर दाखल
वृत्तानुसार, दीपक चहरचे वडील लोकेंद्र चहर यांनी उत्तर प्रदेशातील आग्रा येथील हरिपर्वत पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरनुसार, हैदराबादच्या पारिख स्पोर्ट्सविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारीख स्पोर्ट्सने जया यांच्याकडून करारासाठी 10 लाख रुपये घेतले होते, जे त्यांनी परत केले नाहीत. या फर्मचे मालक ध्रुव पारीख आणि कमलेश पारीख यांची एफआयआरमध्ये नावे आहेत.
काय आहे प्रकरण?
दीपक चहर यांचे कुटुंब आग्राच्या शाहगंज येथील मान सरोवर कॉलनीत राहते. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये अधिकारी असलेले ध्रुव पारीख आणि कमलेश पारीख यांनी दीपक चहरची पत्नी जयासोबत करार केला होता. डीलनुसार, 7 ऑक्टोबर 2022 रोजी जयाकडून 10 लाख रुपये घेतले होते, परंतु अद्याप परत करण्यात आलेले नाहीत. इतकंच नाही तर वृत्तानुसार, पैशाच्या मागणीसाठी शिवीगाळ तर केलीच पण जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात होत्या.
दीपक चहर टीम इंडियातून बाहेर
उल्लेखनीय आहे की दीपक चहर इंडियन प्रीमियर लीगच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा (Chennai Super Kings Team) एक भाग आहे. कर्णधार एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखालील या संघाने त्याला 14 कोटी रुपयांमध्ये संघात पुन्हा सामील करून घेतले होते. मात्र, दुखापतीमुळे दीपक बराच काळ टीम इंडियातून बाहेर आहे. गेल्या वर्षी त्याने बांगलादेशविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला होता.