कोविडनंतर (Covid) विविध देशांची अर्थव्यवस्था ढासळली. त्याची झळ अद्यापपर्यंत सोसावी लागतेय. या मंदीमुळे (Recession) महागाई (Inflation) वाढली, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. जगातली स्थिती अशी असताना भारतावर मात्र या मंदीचा कोणताही परिणाम होणार नाही. इथं मंदीची शक्यता शून्य टक्के आहे. तर इंग्लंड, अमेरिका तसंच न्यूझीलंड या देशांना याची सर्वात जास्त झळ बसणार आहे. शेअर ब्रोकिंग कंपनी असलेल्या झेरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांनी आयएमएफ (The International Monetary Fund) आणि इतर स्त्रोतांकडून जी माहिती मिळाली आहे, त्या माहितीच्या आधारे हा निष्कर्ष मांडला आहे. त्यांनी दाखवलेल्या आकडेवारीवरून असं दिसतं, की भारत हा जगातला असा एकमेव देश आहे, जिथं मंदीची शक्यता जवळपास शून्य टक्के आहे. तर इंग्लंडची अवस्था सर्वात वाईट आहे.
Table of contents [Show]
मंदीचा फटका - टक्केवारी (सर्वाधिक)
इंग्लंडमध्ये (यूके) मंदीची शक्यता 75 टक्के दाखवण्यात आलीय. ऑस्ट्रेलिया खंडातला एक विकसित देश असलेल्या न्यूझीलंडमध्ये 70 टक्के, जागतिक महासत्ता अमेरिकेत 65 टक्के, तर युरोपातला महत्त्वाचा देश जर्मनी, इटलीमध्ये 60 टक्के, कॅनडामध्ये 60 टक्के, फ्रान्समध्ये 50 टक्के आणि दक्षिण आफ्रिकेत 45 टक्के अशी एकूण आकडेवारी किंवा टक्केवारी त्यांनी समोर आणली आहे.
मंदीचा फटका - टक्केवारी (सर्वात कमी)
मंदीची शक्यता सर्वात कमी असलेल्या देशांमध्ये भारत हाच क्रमांक एकवर आहे. तर त्यानंतर इंडोनेशियामध्ये 2 टक्के, सौदी अरेबियामध्ये 5 टक्के, चीनमध्ये 12.5 टक्के आणि ब्राझीलमध्ये 15 टक्के आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) ताज्या आकडेवारीनुसार, 2023मध्ये भारतात सर्वाधिक उत्पादन होणार आहे. म्हणजे भारताचा विकास जास्तीत जास्त होण्याची शक्यता अधिक आहे.
To my many friends who have graduated from fancy colleges in the #US, working there, considering moving back home to start something. All indications point to #India being 'the place' to be this decade; from a relative standpoint, for an #entrepreneur, the opportunity is here... pic.twitter.com/BJqS8pLkq2
— Nikhil Kamath (@nikhilkamathcio) April 13, 2023
जीडीपी वाढीचा दर - टक्केवारी (जास्त)
आयएमएफच्या ताज्या रिपोर्टनुसार, 2023मध्ये भारताचा वास्तविक जीडीपी (Gross domestic product) वाढीचा दर 5.9 टक्के असण्याची अपेक्षा आहे. यानंतर चीनचा क्रमांक 5.2 टक्के आहे. इंडोनेशियाचा विकास दर 5 टक्के, सौदी अरेबियाचा 3.1 टक्के आणि मेक्सिकोचा 1.8 टक्के विकास दर असणार आहे.
जीडीपी वाढीचा दर - टक्केवारी (कमी)
जीडीपीमध्ये सर्वात वाईट स्थिती इंग्लंडची होणार असल्याचं दिसतंय. याठिकाणी आर्थिक विकास दर केवळ 0.3 टक्के दाखवण्यात आलाय. त्यानंतर जर्मनीचा 0.1 टक्के नकारात्मक असेल. 2023मध्ये दक्षिण आफ्रिकासारखे इतर देश 0.1 टक्के, फ्रान्स 0.7 टक्के आणि इटली 0.7 टक्के दरानं विकास करतील.
'परदेशातल्या भारतीयांनी मायदेशी परतावं'
आगामी काळातली ही स्थिती पाहता ज्या देशांना मंदीचा फटका बसेल अशा देशात राहणाऱ्या भारतीयांनी परतावं. जे अमेरिका, इंग्लंड किंवा मंदीचा फटका बसणाऱ्या इतर देशात काम करत असतील किंवा शिक्षण घेत असतील, त्यांनी भारतात परतण्याची तयारी करावी. आगामी काळात भारताचा विकास दर चांगला राहणार आहे. येणारं दशक भारताचं असणार आहे. दिवसही बदलणार असल्याचं निखील कामत यांनी म्हटलंय.