लोकल प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लोकल ट्रेन वेळेवर नसल्यामुळे मुंबईत प्रवाशांचा नेहमी खोळंबा होतो. पण, आता घरातून निघण्यापूर्वी ‘यात्री अॅप’वर तुम्ही पकडणार असलेली लोकल त्या क्षणी नेमकी कुठे आहे आणि तुमच्या स्थानकात कधी पोहोचणार आहे याची माहिती तुम्ही घेऊ शकाल. हो या अॅपवर तुम्हाला तुमच्या ट्रेनविषयी सगळी माहिती मिळणार आहे. तुमची ट्रेन वेळेवर आहे का, आता कोणत्या स्थानकावर पोहोचली याबरोबरच आज मेगाब्लॉक मुळे ट्रेन आहे की रद्द झालीये, अशी सगळी माहिती या अॅपवर मिळणार आहे. ही सगळी माहिती आपल्या एम-इंडिकेटर अॅप वर सुद्धा मिळतेय. पण यात्री अॅप हे रेल्वे मंत्रायलाचं अधिकृत अॅप असल्याने इकडची माहिती ही जास्त बरोबर असू शकते.
रेल्वे मंत्रालयाने यावर्षी मुंबईतल्या रेल्वे प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा सपाटा लावला आहे. एसी लोकलची संख्या वाढवणे, रेल्वे स्थानकांचे नुतनीकरण, स्थानकांवर आवश्यक त्या सुविधांसह एस्केलेटर व पूल बांधणे, लोकल फेऱ्यांची संख्या वाढवणे, रेल्वे ट्रॅक वाढवणे अशी अनेक कामं रेल्वे मंत्रालयाकडून संपूर्ण मुंबई व मुंबईच्या उपनगरात सुरू आहेत.
या सगळ्या सुविधांमध्ये आणखी भर पडली आहे ती म्हणजे रेल्वे मंत्रालयाच्या ‘यात्री अॅपची’. पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर अश्विन कुमार मिश्रा यांच्या हस्ते या अॅपचा शुभारंभ केला. बुधवारी 5 एप्रिल रोजी चर्चगेट स्थानकांमध्ये हा सोहळा पार पडला.
काय आहे यात्री अॅप
यात्री अॅप हे मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण असं अॅप आहे. या अॅपमध्ये तुम्हाला रेल्वे ट्रेन विषयी रियल टाइम माहिती मिळणार आहे. महत्त्वाच्या सुचना, रेल्वेचे वेळापत्रक, महत्वाच्या स्थानकांची माहिती व त्या स्थानकावर उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती पुरवली जाणार आहे. यासोबतच मुंबई मेट्रो आणि बेस्ट बसेसच्या माहितीचा सुद्धा समावेश केला आहे.
दररोजच्या प्रवाशांसोबत, नवीन रेल्वे प्रवाशांना, मुंबई बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना आणि पर्यटकांना या अॅपचा चांगला उपयोग होऊ शकतो.
या अॅपमध्ये मुंबई रेल्वे ट्रेनचे मार्ग, मुंबईतून बाहेरगावी जाणाऱ्या एक्स्प्रेसची माहिती, लोकल ट्रेनचे तिकीट दर आणि मुख्यत: म्हणजे तुमच्या तिकीट नसेल किंवा तुम्ही रेल्वे नियमांचं उल्लंघन केलं तर काय शिक्षा होईल यांची माहितीसुद्धा दिली आहे.
दिव्यांग फ्रेंडली अॅप
या अॅपचा आणखी विशेष गुणधर्म म्हणजे हे दिव्यांग व्यक्तिंना सुद्धा अगदी साध्यासोप्या पद्धतीने हे अॅप वापरता येणार आहे. त्यांना गुगल टॉकच्या मदतीने हे अॅप वापरता येईल. गुगल टॉकवर ‘ओके गुगल, टॉक टू यात्री रेल्वेज’ असं म्हणून आपल्या ट्रेनचा रूट किंवा नंबर सांगितल्यास गूगल ती माहिती फेच करून आपल्यापर्यंत पोहोचवू शकेल.
अॅपची निर्मिती
मुंबईमध्ये दररोज लाखो प्रवासी हे लोकल ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करतात. मात्र, या ट्रेनची माहिती देणार अधिकृत अॅप अस्तित्वात नव्हतं. अखेर रेल्वे मंत्रालयाने आपले कर्तव्य जाणून प्रवाशांच्या सुविधेसाठी हे अॅप सुरू केलं. एम/एस सीडीपी इंडिया प्राय.लिमिटेड या कंपनीच्या साहय्याने हे अॅप सुरू करण्यात आलं आहे. प्रवाशांना त्यांच्या ट्रेनची रियल टाइम माहिती मिळावी यासाठी प्रत्येक ट्रेनमध्ये जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाईस बसवण्यात आलं आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध असून त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये 68 Mb ची जागा ठेवावी लागणार आहे.