चायनीज मोबाइल फोन निर्माता कंपनी असलेली शाओमी (Xiaomi) भारतात पिछाडीवर आहे. दीर्घकाळ कंपनीनं भारतीय बाजारपेठेत आपलं शीर्ष स्थान कायम ठेवलं होतं. मात्र मागच्या काही काळापासून कंपनीचे दिवस काही फारसे चांगले राहिल्याचं दिसत नाही. एकीकडे भारतीय बाजारपेठेतला हिस्सा कमी करण्याचं आव्हान कंपनीसमोर आहे. तर दुसरीकडे, सरकारी यंत्रणांच्या कठोर नियमांनाही कंपनीला सामोरं जावं लागत आहे. या सगळ्याच घडामोडींच्या दरम्यान कंपनी भारतीय व्यवसायात महत्त्वाचे असे बदल करणार आहे. त्याचाच एक भाग आहे कर्मचारी कपात (Layoffs). कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत विशेषत: भारतातली कर्मचारी संख्या कमी करणार आहे.
Table of contents [Show]
मोठ्या प्रमाणात टाळेबंदीची भीती
ईटीनं यासंदर्भात वृत्त दिलं आहे. शाओमी इंडियाच्या अनेक वर्तमान आणि माजी कर्मचार्यांनी सांगितलं, की शाओमी आपल्या भारतातल्या व्यवसायाची पुनर्रचना करणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात होऊ शकते. भारतीय व्यवसायातल्या कर्मचाऱ्यांची संख्या 1000पेक्षा कमी करण्याचं कंपनीचं सध्या नियोजन आहे. वर्ष 2023च्या सुरुवातीला शाओमी इंडियाच्या कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास 1400 ते 1500 इतकी होती.
आधीही केली होती कर्मचारी कपात
शाओमी इंडियानं यापूर्वीदेखील कर्मचारी कपात केली आहे. कंपनीनं याच महिन्यात सुमारे 30 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. ईटीनं दिलेल्या वृत्तानुसार, शाओमी इंडियाच्या व्यवसायाच्या संरचनेत सध्या बदल होत आहे. या मोठ्या प्रमाणातल्या बदलांमुळे निर्णय घेण्याचे बहुतेक अधिकार चीनस्थित मूळ कंपनीकडे गेले आहेत. आता चीनस्थित पॅरेन्ट कंपनी शाओमी इंडियाच्या ऑपरेशनशी संबंधित बहुतेक निर्णय घेत आहे. इंडिया टुडेनं यासंदर्भात ट्विट केलं आहे.
Xiaomi India may lay off some employees as the company plans to bring the headcount below 1000.
— IndiaTodayTech (@IndiaTodayTech) June 29, 2023
https://t.co/34ji7ZwnPL
तिसऱ्या क्रमांकावर घसरण
वर्ष 2023च्या पहिल्या तिमाहीत शाओमी इंडियाच्या शिपमेंटमध्ये मोठी घट झाली आहे. ती फक्त 5 दशलक्ष इतकी कमी झाली. याच्या फक्त एक वर्षापूर्वी शाओमी इंडियाचा शिपमेंट आकडा 7-8 दशलक्ष इतका होता. शाओमी इंडिया भारतीय बाजारपेठेत बऱ्याच काळापासून पहिल्या स्थानी होती. मात्र आता कंपनी खूपच मागे पडल्याचं दिसून येत आहे. सध्या सॅमसंग पहिल्या स्थानी तर व्हिवो (Vivo) दुसऱ्या स्थानावर आहे.
ईडीकडून संपत्ती जप्त
शाओमी इंडियाला अलीकडेच सरकारी संस्थांकडून कारवाईचा सामना करावा लागला. चुकीच्या पद्धतीनं देशाबाहेर पैसे पाठवल्याचा कंपनीवर आरोप आहे. या आरोपावरून अंमलबजावणी संचालनालयानं (ED) शाओमी इंडियाची 5500 कोटी रुपयांची बँक मालमत्ता जप्त केली आहे. कंपनीनं ईडीच्या आरोपांना आणि मालमत्ता जप्त करण्याला सध्या कायदेशीर आव्हान दिलं आहे.