भारतातील महत्त्वाच्या IT कंपन्यांपैकी एक असलेल्या विप्रोने (Wipro) अंतर्गत चाचणीमध्ये (Internal Test) खराब कामगिरी केलेल्या शेकडो नवीन कर्मचार्यांना काढून टाकले आहे.
याबद्दल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, विप्रोमध्ये, आम्ही स्वतः सर्वोच्च मानकांचा आदर्श ठेवत असतो, याचा आम्हांला अभिमान आहे. आम्ही Wipro साठी घालून दिलेल्या मानकांच्या अनुषंगाने, अशी अपेक्षा करतो की प्रत्येक एंट्री-लेव्हल (Entry Level Employee) कर्मचार्याकडे त्यांच्या नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात प्राविण्य असावे. मूल्यमापन प्रक्रियेमध्ये (Evaluation Process) कर्मचार्यांना संस्थेच्या व्यावसायिक उद्दिष्टांची माहिती आहे की नाही आणि आमच्या ग्राहकांच्या आवश्यकतांना ते समजून घेतात की नाही यावर जास्त भर दिला जातो, असेही कंपनीने म्हटले आहे.
जे नवीन रुजू झालेले कर्मचारी या कर्मचारी मूल्यमापन चाचणीत अपयशी ठरले आहेत त्यांना आम्हांला काढून टाकावे लागत असल्याचे कंपनीने माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. मूल्यमापन चाचणीनंतर 800 नवीन कर्मचार्यांना काढून टाकण्यात आले असल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांनी केला होता. परंतु कंपनीने हा आरोप फेटाळला आहे. विप्रोने मीडियाशी संवाद साधताना सांगितले की, “नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूल्यांकनात प्रशिक्षणानंतर देखील सुधारणा न दिसल्याने आम्हाला 452 फ्रेशर्सना कामावरून काढून टाकावे लागले आहे."
कंपनीने अशा कर्मचाऱ्यांना टर्मिनेशन लेटर पाठवले आहे. या पत्रात नमूद करण्यात आले आहे की कर्मचाऱ्यांना कंपनीने त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी खर्च केलेले 75,000 रुपये देणे बंधनकारक होते, परंतु कंपनीने ते आता माफ केले आहे.
विप्रोमधून कामावरून कमी केलेल्या एका फ्रेशरने सांगितले की , “मला जानेवारी 2022 मध्ये ऑफर लेटर (Offer Letter) मिळाले होते, परंतु काही महिन्यांच्या विलंबानंतर त्यांनी मला ऑनबोर्ड केले. आणि आता परीक्षेचे कारण सांगून ते मला कामावरून काढून टाकत आहेत".
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            