एक हजार रुपयांच्या नोटा रिझर्व बँक ऑफ इंडिया परत चलनात आणू शकते याबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर या चर्चेला उधाण आले आहे. तुम्हांला माहितीच असेल की 8 नोव्हेंबर 2016 साली रात्री 8 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 500 आणि हजाराच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर 500 आणि हजाराच्या नोटांची कायदेशीर चलन म्हणून मान्यता रद्द करण्यात आली होती. देशातील लाखो नागरिकांना या निर्णयाचा फटका बसला होता. आता 2016 नंतर 2023 मध्ये पुन्हा हजाराच्या नोटा चलनात येणार का? याबद्दल नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.
काय म्हणाले RBI?
एक हजारच्या नोटा पुन्हा चलनात येंतील अशी चर्चा सुरु झालेली असताना रिझर्व बँक ऑफ इंडियाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. सोशल मिडीयावर 1000 रुपयांच्या नोटेवर सुरु असलेली चर्चा लक्षात घेता रिझर्व बँक ऑफ इंडियाने हे स्पष्टीकरण दिले आहे. RBI च्या म्हणण्यानुसार 1000 रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात आणण्याची RBI ची कुठलीही योजना नाहीये.
RBI च्या या स्पष्टीकरणानंतर हजार रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात येणार नाहीये हे मात्र स्पष्ट झाले आहे.
RBI is not in consideration of the re-introduction of Rs 1000 note: Sources
— ANI (@ANI) October 20, 2023
चलनी नोटांचा प्रवाह ठीकठाक
याबद्दल सविस्तर माहिती देताना आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत रोख रकमेची गरज पूर्ण करण्यासाठी चलनी नोटा पुरेशा प्रमाणात आहेत. 2000 हजारांच्या नोटा चलनातून रद्दबातल केल्यानंतर पैशांचा तुटवडा निर्माण होईल आणि त्यामुळे नागरिकांच्या समस्या वाढतील अशी चर्चा सुरु होती. आरबीआयच्या या घोषणेनंतर या समस्येचे देखील निराकरण झाले आहे.
याशिवाय अर्थव्यवस्थेत 500 रुपयांच्या नोटा माफक प्रमाणात उपलब्ध असून नागरिकांना चलनी नोटांची अडचण निर्माण होणार नाही असे रिझर्व बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे. सोबतच गेल्या काही वर्षांपासून भारतात डिजिटल व्यवहार करण्याकडे नागरिकांचा कल असल्याने अशी काही समस्या निर्माण होणार नाही असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.