बांधकाम साहित्यामध्ये स्टीलच्या किंमती हा महत्त्वाचा घटक आहे. स्टीलच्या किंमती वाढल्यास बांधकामाचा खर्चही सहाजिक वाढतो. मागील काही दिवसांपासून स्टीलच्या किंमतीमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. (volatile steel prices) पुढील काही दिवस स्टीलच्या किंमतींमध्ये अचानक चढउतार पाहायला मिळू शकतात, असे दिसते. स्टीलच्या किंमती जर वाढणार असतील तर अनेक ग्राहक आगाऊ स्टील खरेदीला पसंती देतात. मात्र, जर स्टील घेऊन ठेवले आणि नंतर किंमती उतरल्या तर पश्चातापही होतो.
स्टीलच्या किंमती अस्थिर असण्यामागील कारणे?
जागतिक स्टील पुरवठा साखळीमध्ये अडथळा निर्माण झाल्याने किंमतींमध्ये चढउतार होत असल्याचे समोर आले आहे. तसेच स्टील तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतींमध्येही वाढ झाल्याने किंमतीत चढउतार होत आहे. पुढील काही दिवस किंमतींमध्ये चढउतार राहू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.
मागील आठवड्यात हॉट रोल्ड कॉइल स्टीलमध्ये प्रती टन 1400 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे हॉट रोल्ड स्टीलचा दर 60,70रुपये एवढा झाला आहे. मागील सहा महिन्यांपासून स्टीच्या किंमती स्थिर नाहीत. प्रत्येक आठवड्याला किंमती वरखाली होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. स्टीलचा पुरवठा साखळी, वाहतूक आणि साठवणूक या संपूर्ण लॉजिस्टिक सायकलमध्ये अडथळा निर्माण झाल्याचा फटका स्टीलच्या किंमतींना बसत आहे. हार्ड कुकिंग कोलच्या किंमतीही अचानक वाढल्याने त्याचा परिणाम स्टीलच्या किंमतीवर होत आहे.
स्टील तयार करण्यासाठी आयर्न ओर (कच्चे लोखंड) आणि कुकिंग कोल हा कच्चा माल प्रामुख्याने लागतो. या कच्च्या मालाच्या किंमतीतही मागील सहा महिन्यांपासून वाढ होत आहे. भारतामध्ये कच्चे लोखंड मुबलक प्रमाणात उपलब्ध असून कुकिंग कोलसाठी आयातीवर अवलंबून राहावे लागते. कच्च्या मालातील दर बदलांचा थेट परिणाम, बांधकाम, पायाभूत सुविधा प्रकल्प, वाहन निर्मिती आणि इतर स्टीलपासून तयार करण्यात येणाऱ्या वस्तुंच्या किंमतींवर होतो.
स्टील विक्रेत्यांचे म्हणणे काय आहे?
स्टीलच्या अस्थिर किंमतींबाबत आम्ही पुण्यातील विक्रेत्यांसोबत चर्चा केली. पुण्यामध्ये बांधकामासाठीच्या स्टीलचे सरासरी दर 60 ते 65 रुपये किलो असल्याचे कालिका स्टील या दुकानाचे मालक रतन शाह यांनी सांगितले. कच्च्या मालाच्या किंमती वाढल्याने स्टीलच्या किंमती वाढल्याचे त्यांनी सांगितले. बाजारातील स्टीलची मागणी स्थिर असल्याचेही शाह म्हणाले.