RBI Withdrawn 2000 Note: RBI ने 2000 रुपयांची नोट मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. क्लीन नोट धोरणाअंतर्गत हा मोठा निर्णय घेतल्याचे बँकेने सांगितले आहे. मात्र, या नोटा काही काळासाठी चलनात असणार आहे. या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बँकांमधून काढता येतील, असेही आरबीआयने सांगितले, त्याची प्रक्रिया 23 मेपासून सुरू होणार आहे. 2016मध्ये नोटबंदीनंतर जवळपास साडेसहा वर्षांनी हा निर्णय का घेतला असावा? काय असतील यामागची कारणे? माहीत करून घेऊया.
Table of contents [Show]
नोटांची मुदत संपत आली आहे
आरबीआयच्या म्हणण्यानुसार, 2,000 रुपयांच्या सुमारे 89 टक्के नोटा मार्च 2017 पूर्वी चलनात आल्या होत्या. या नोटांनी त्यांचे 4 ते 5 वर्षांचे शेल्फ लाइफ ओलांडले आहे किंवा ओलांडणार आहेत. त्या नोटांची मुदत 4 ते 5 वर्षापुरतीच मर्यादित होती.
2000च्या नोटा छापण्याचा उद्देश पूर्ण झाला
RBI ने नोव्हेंबर 2016 मध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्या होत्या. 2000 रुपयांची नोट चलनात आणण्याचा उद्देश त्यावेळी अर्थव्यवस्थेची चलनाची गरज पूर्ण करणे हा होता. हे RBI कायदा 1934च्या कलम 24(1) अंतर्गत लागू करण्यात आले होते. नोटबंदीच्या काळात काढण्यात आलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या चलनाचा बाजार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम कमी व्हावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर तो उद्देश आता पूर्ण झाला आहे.
2018पासून छपाई बंद
नोटबंदीनंतर 2000 रुपयांच्या नोटा चलनात आल्या. बँकांमध्ये इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्या, तेव्हा दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा उद्देशही पूर्ण झाला. त्यामुळे 2018मध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाईही बंद करण्यात आली होती.
चलनात असलेल्या या नोटांची संख्या कमी
31 मार्च 2018 पर्यंत 6.73 लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. म्हणजेच एकूण नोटांमध्ये त्यांचा वाटा 37.3 टक्के होता. 31 मार्च 2023पर्यंत हा आकडा 3.62 लाख कोटी रुपयांवर आला आहे. म्हणजेच चलनात असलेल्या एकूण नोटांमध्ये 2000 रुपयांच्या फक्त 10.8 टक्के नोटा शिल्लक होत्या.
या नोटांचा व्यवहारात फारच कमी वापर
आरबीआयच्या म्हणण्यानुसार, 2,000 रुपयांच्या नोटांचा व्यवहारात फारसा वापर केला जात नाही. याव्यतिरिक्त, इतर मूल्यांच्या नोटादेखील सामान्य लोकांसाठी पुरेशा चलनात अस्तित्वात आहेत. त्यामुळे आरबीआयच्या क्लीन नोट धोरणांतर्गत 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.