Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

2000 Note withdrawn: दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाद होणार; आता पुढे काय? तुमच्या प्रश्नांची उत्तरे येथे वाचा

Rs 2,000 notes withdrawn

Image Source : www.reuters.com

दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. त्यामुळे आता या नोटा एकतर बँकेत जमा कराव्या लागतील किंवा बदलून घ्यावा लागतील. मात्र, या आधीचा नोटबंदीचा अनुभव पाहता नागरिक पुन्हा एकदा गोंधळून गेले आहेत. दोन हजाराच्या नोटांबद्दल नागरिकांना पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येथे मिळतील.

Rs 2,000 notes withdrawn: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जनतेमध्ये नोटंबदीवरून चर्चा सुरू झाली आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत दोन हजाराच्या चलनी नोटा बँकेत जमा कराव्या लागतील. आता पुन्हा 2016 सालातील नोटबंदीसारखा गोंधळ उडणार का? बँकांच्या बाहेर रांगेत ताटकळत उभं राहायची वेळ येणार का? नक्की प्रक्रिया काय? असे अनेक प्रश्न नागरिकांमधून विचारले जात आहेत.

नोटा जमा करण्याची किंवा बदलून घेण्याची प्रक्रिया आरबीआयाने जाहीर केली असली तरी या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते हे लवकरच कळेल. नोटा बदलून घेण्यासाठी नागरिक बँकांमध्ये जातील तेव्हाच बँका परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहेत की नाही हे समजेल. आता उद्यापासून बँका नागरिकांना 2 हजार रुपयांच्या नोटा देणार नाहीत आणि ज्या काही नोटा मार्केटमध्ये आहेत त्या जमा करून घेण्यात येतील. (FAQ about 2 thousand note) त्यानिमित्ताने काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहूया.

दोन हजारांच्या नोटेसंबंधीत तुम्हाला पडलेल्या प्रश्नांनी उत्तरे (Rs 2,000 notes withdrawn FAQ)

2000 रुपयांच्या नोटा मार्केटमधून का काढून घेण्यात येत आहेत?

2016 साली नोव्हेंबर महिन्यात आरबीआय अॅक्ट 1934 मधील Section 24(1) नुसार दोन हजार रुपयांच्या नोटा बाजारात आणण्यात आल्या होत्या. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बाद केल्यानंतर अतिरिक्त पैशांची गरज भागवण्यासाठी घाईघाईत 2000 रुपयांच्या नोटा बाजारात आणल्या होत्या. 2018-19 पासून दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद आहे. 

तसेच दोन हजार रुपयांच्या नोटांची बाजारातील देवाणघेवाण कमी झाली आहे. इतर चलनी नोटा जसे 500, 200,100,50 या नोटांची संख्या पुरेशी असल्याने आता 2 हजार रुपयांच्या नोटेची गरज कमी वाटू लागल्याने हा निर्णय घेतला असावा. तसेच या नोटांचे आयुर्मान (लाइफस्पॅन) फक्त 4-5 वर्ष इतकेच होते, असे बोलले जाते. ते आता संपत आल्याने नोटा चलनातून बाद केल्याचे दिसून येते.

क्लिन नोट पॉलिसी म्हणजे काय? 

जनतेला चांगल्या क्वालिटीच्या (गुणवत्ता) चलनी नोटा मिळाव्यात यासाठी आरबीआयाने क्लिन नोट पॉलिसी लागू केली आहे.

दोन हजार रुपयांच्या चलनी नोटा व्यवहारात वापरता येतील का? 

हो. 2000 हजार रुपयांच्या नोटांद्वारे नागरिकांना व्यवहार करता येतील. तुम्ही पेमेंट स्वीकारू शकता. मात्र, 30 सप्टेंबर 2023 पर्यंत या नोटा बँकेत जमा करण्याचे तसेच बदलून घेण्याचे आवाहन आरबीआयने केले आहे.

ज्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत त्यांनी काय करावे? 

ज्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत त्यांनी बँकेच्या शाखेत जाऊन एकतर नोटा जमा कराव्यात किंवा बदलून घ्याव्यात. दोन हजार रुपयांच्या बदल्यात इतर चलनी नोटा बँकेकडून देण्यात येतील. 30 सप्टेंबरपर्यंत ही सुविधा सुरू असेल. आरबीआयच्या 19 प्रादेशिक कार्यालयातही नोटा बदलून घेता येतील. 

बँक खात्यात नोटा जमा करण्यासाठी मर्यादा आहे का?

बँकेच्या खात्यात दोन हजारांच्या नोटा जमा करण्यास कोणतीही मर्यादा नाही. मात्र, KYC आणि इतर आरबीआयच्या नियमांनुसार जेवढे पैसे जमा करण्यास परवानगी आहे तेवढेच पैसे जमा करता येतील.

नोटा बदलून घेण्यास किती मर्यादा आहे? 

एका वेळी नागरिकांना 20 हजार रुपये म्हणजेच दहा नोटा बदलून मिळतील. त्यापेक्षा जास्त नोटा एकावेळी बदलून मिळणार नाहीत. 

बँकेच्या सेवा केंद्रावरुन नोटा बदलून मिळतील का? 

ज्या भागात बँकांच्या शाखा नाहीत अशा भागात सहसा बँकेचे सेवा केंद्र (Business Correspondents ) असते. अशा ठिकाणीही दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेता येतील. मात्र, एका दिवसात फक्त 4 हजार रुपये बदलून मिळतील.

कोणत्या तारखेपासून नोटा बदलून मिळतील? 

बँकांना नोटा बदलून देण्यासाठी तयारीस अवधी मिळावा म्हणून 23 मे 2023 पासून नागरिकांनी नोटा बदलून घेण्यास जावे, अशी विनंती आरबीआयने केली आहे. 

नोटा बदलून घेण्यासाठी संबंधित बँकेत खाते असणे अनिवार्य आहे का? 

नाही. तुमचे ज्या बँकेमध्ये खाते नाही अशाही बँकेतून तुम्ही नोटा बदली करून घेऊ शकता. मात्र, 20 हजार रुपयांची मर्यादा राहील.

नोटा बदलून घेण्यासाठी शुल्क आहे का? 

नाही. नोटा बदलून घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. ही सुविधा मोफत असेल. कोणालाही पैसे देण्याची गरज नाही.

दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी व्यवस्था असेल का? 

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना त्रास होऊ नये अशा प्रकारे नियोजन करण्याचे आदेश आरबीआयने सर्व बँकांना दिले आहे.

बँकेने नोटा बदलून/जमा करून घेण्यास नकार दिल्यास काय करावे? 

जर एखाद्या बँकेने नोटा बदलण्यास किंवा जमा करून घेण्यास नकार दिल्यास सर्वप्रथम बँकेत तक्रार दाखल करावी. 30 दिवसांच्या आत बँकेने तक्रारीवर उत्तर न दिल्यास किंवा तुमचे समाधान न झाल्यास तुम्ही आरबीआय लोकपाल संकेतस्थळावरुन तक्रार दाखल करू शकता