संकटे कोणतीही वेळ सांगून येत नाहीत. गेल्या 2 वर्षातील कोरोनाची स्थिती पाहता तुमच्या लक्षात आले असेल की, संकट कोणत्याही मार्गाने येऊ शकते. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी बचत ही खूप महत्त्वाची गोष्ट ठरली आहे. आपल्या सगळ्यांसाठीच बचत गरजेची आहे. आपल्याकडे पुरेशी बचत नसेल तर आगामी काळात अनेक संकटांना सामोरे जावे लागेल. संकटकाळात आपल्याकडे पैसे असणे अत्यंत गरजेचे आहे आणि पैशांची बचत करण्यासाठी खर्चाला लगाम घालणे आवश्यक आहे.
खर्चाचे नियोजन
थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे, एक-एक पैसा गाठीशी बांधून आपण भविष्यासाठी पैसे जमा करत असतो. अशापद्धताने पैसा मिळवण्यासाठी आपण आपल्या आयुष्यातील बरीच वर्षे खर्ची घालत असतो. पण हाच पैसा खर्च करायला आपल्याला खूप वेळ लागत नाही. म्हणून पैसा खर्च करताना तो खूप जाणीवपूर्वक पद्धतीने केला पाहिजे. खर्चाचे नियोजन केले पाहिजे. यामुळे आपल्याकडून विनाकारण पैसे खर्च होणार नाही. आणि आपल्या बचतीच्या रकमेवर अतिरिक्त ताण येणार नाही.
खर्चाचा हिशोब
प्रत्येक महिन्याच्या खर्चाचा हिशोब ठेवल्यामुळे खर्चाचा अंदाज येतो. हिशोबातून वायफळ गोष्टींवर किती खर्च केला आणि गरजेच्या गोष्टींवर किती खर्च झाला, हे लक्षात येते. यामुळे भविष्यात खर्च करण्याच्या सवयीवर नियंत्रण आणण्यास मदत होते. प्रत्येक महिन्याचे नियोजन करून त्यानुसार खर्च केल्यास तुमच्याकडून मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते.
लक्ष्य निर्धारित करा
आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी खिशात पुरेसा पैसा असायला हवा. पैसा टिकून राहण्यासाठी खर्चावर नियंत्रण हवं आणि खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी खर्चाचं लक्ष्य निर्धारित करायला हवं. म्हणजेच खर्चाचं नियोजन लक्ष्य ठरवून केलं तर त्यातून त्यातून अतिरिक्त खर्चावर आपोआप नियंत्रण येण्यास मदत होते. यासाठी डोळ्यासमोर लक्ष्य ठेऊन नियोजन केले पाहिजे.
खर्चाची प्राथमिकता
खर्चाची प्राथमिकता ठरवताना खर्चाची एक यादी तयार करा. ही यादी पूर्ण झाली की यादीतील सर्वांत वरच्या खर्चासाठी ठराविक पैसे बाजूला काढून ठेवा आणि आता सर्वांत खालच्या खर्चाकडे या. हा खर्च खरंच आवश्यक आहे का? याचा विचार करा. कुटंबातील सर्वांचे यावर मत घ्या आणि मग त्याच्याबद्दलचा निर्णय घ्या. यामुळे तुमच्या एकूण परिवाराच्या खर्चावर नियंत्रण येईल.
तर आम्हाला खात्री आहे की, खर्चाचा हिशोब का ठेवायला हवा; याची कारणे तुम्हाला नक्कीच आवडली असतील. यामुळे तुम्हाला एक चांगली आर्थिक शिस्त लागण्यास मदत तर होईलच पण तुमच्या खर्चाच्या हिशोबातून एक भरभक्कम अशी बचत ही उभी राहील.