China Lemon Sale: चीनमध्ये ज्या प्रदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढत आहे; त्या भागातील नागरिकांकडून रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आणि रोगांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी नैसर्गिक रोगप्रतिकारक गोष्टींचा वापर करण्यास सुरुवात केली. याचाच परिणाम म्हणून चीनमध्ये लिंबूची मागणी प्रचंड वाढली आहे. तसेच लिंबाच्या वाढत्या मागणीमुळे त्याची किंमत गगनाला भिडल्याची चर्चा आहे.
चीनमध्ये नवीन व्हॅरिअंटचा धुमाकूळ!
कोरोनाची सुरूवात चीनमधूनच झाली होती. त्यावेळी चीनने म्हणजे 2019 पासून झिरो कोविड पॉलिसी (Zero Covid Policy) काटेकोरपणे राबवली होती. त्यामुळे काही प्रमाणात कोविडच्या रूग्णांची संख्या नियंत्रित होती. पण आता पुन्हा चीनमध्ये कोविडच्या नवीन वॅरिएंटने धुमाकूळ घातला आहे. यामुळे चीनमध्ये कोरोनाच्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे.
चीनमधील नागरिकांकडे मागील दोन वर्षांचा अनुभव पाठीशी असल्याने तेथील नागरिकांनी नैसर्गिकरीत्या रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यात वेगवेगळ्या फळांचा वापर प्रामुख्याने वाढला आहे. काही विशिष्ट फळांमधून व्हिटॅमीन सी (Vitamin C) मिळत असल्याने त्यांची मागणी प्रचंड वाढली आहे.
अर्धा किलो लिंबांची किंमत 72 रुपये
लिंबूमध्ये व्हिटॅमीन सी चे प्रमाण भरपूर असल्याने अचानक चीनमध्ये लिंबू मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. खासकरून बिजिंग, शांघाय यासारख्या शहरांमध्ये याची मागणी अधिक आहे. या वाढत्या मागणीमुळे लिंबूच्या किमतीतही प्रचंड वाढ झाली. काही वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये यापूर्वी अर्धा किलो लिंबू 2 किंवा 3 युआनला मिळत होती. आता अर्धा किलो लिंबासाठी 6 युआन द्यावे लागत आहे. युआन हे चीनचे चलन आहे. एका युआनचे भारतीय मूल्य आजच्या (दि. 21 डिसेंबर) दरानुसार 11.87 रुपये आहे.
लिंबूसोबत संत्रे, पेअर या फळांना मागणी!
लिंबूसोबत ज्या फळांमध्ये व्हिटॅमीन सी ची मात्रा अधिक आहे. त्या फळांची मागणी सुद्धा वाढली आहे. यामध्ये संत्रे, पेअर, यलो पीच (Yellow canned peaches) यांची मागणी आणि किंमतसुद्धा वाढली. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर या फळांना अधिक मागणी आहे. चीनमधील लोकांचा असा विश्वास आहे की, थंड आणि गोड फळे खाल्याने विशेषत: आजारपणात तुमची भूक वाढण्यास आणि त्यातून रिकव्हर होण्यास मदत होऊ शकते.