Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Startup funding: स्टार्टअप कंपन्यांकडे गुंतवणूकदारांनी फिरवली पाठ; फंडिंग रोखण्याची कारणे काय?

Startup funding

भारतामध्ये दरवर्षी हजारो स्टार्टअप कंपन्या सुरू होतात. मात्र, यातील 90% कंपन्या बंद पडतात, असे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. काही ठराविक कंपन्यांनाच प्रसिद्धी मिळते. मात्र, अशा अनेक कंपन्या असतात, ज्या पैशांअभावी बंद पडतात. या कंपन्यांची साधी चर्चाही होत नाही. कोरोनाकाळात ज्या प्रमाणात स्टार्टअप कंपन्यांना फंडीग होत होते. तसे आता होत नाही. यामागे काय कारणे आहेत ते आपण या लेखात पाहू.

Startup Funding: कोरोनाकाळात भारतामध्ये स्टार्टअपचे वारे वाहत होते. मात्र, कोरोनाची साथ ओसरताच स्टार्टअप कंपन्यांनाही उतरती कळा लागली. लॉकडाऊनमुळे नागरिक घरांमध्ये अडकून पडले होते. बाजारपेठा बंद होत्या. या काळात सर्वच क्षेत्रात ऑनलाईन सेवांनी शिरकाव केला होता. नागरिकांना ऑनलाइन सेवा देण्यासाठी हजारो स्टार्टअप सुरू झाल्या. कोरोना सुरू होता तोपर्यंत या कंपन्यांना नफाही झाला. गुंतवणूकदारही खूश होते. मात्र, जसा कोविडचा प्रसार थांबला या कंपन्याचे उत्पन्न घटू लागले. सध्या आपण पाहतच आहोत की, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात नोकरकपात सुरू आहे.

स्टार्टअपमध्ये होणारी गुंतवणूक 70 टक्क्यांनी घटली

2022 पासून स्टार्टअपमधील गुंतवणूक कमी होऊ लागली. जानेवारी-मार्च तिमाहीतील ताज्या आकडेवारीनुसार स्टार्टअप कंपन्यांमध्ये होणारी गुंतवणूक 70 टक्क्यांनी घटली आहे. फक्त व्यवसाय आणि महसूल वाढीपेक्षा नफा वाढीवर लक्ष देण्यास गुंतवणूकदार कंपन्यांना सांगत आहेत. मात्र, यातील अनेक कंपन्यांना हे शक्य होत नाही. एज्युकेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रातील अनेक स्टार्टअप यामुळे बंद पडले. ऑनलाइन शिक्षणाचे मॉडेल फक्त कोरोनाकाळात चालले. मात्र, त्यानंतर शाळा, महाविद्यालये आणि क्लासेस सुरळीत झाल्यामुळे ऑनलाइन कंपन्यांचे ग्राहक कमी झाले. सबस्क्रिप्शन बेस कमी झाल्याने त्यांचे उत्पन्नही रोडावले. यातील अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. तसेच अतिरिक्त विभाग बंद केले आहेत. खर्च कमी करण्याचा प्रयत्न कंपन्यांकडून सुरू आहे.

2023 वर्षातील मोठ्या डील कोणत्या?

स्टार्टअप कंपन्यांकडे गुंतवणूकदार पाठ फिरवत असले तरी जानेवारीपासून काही मोठ्या डीलही झाल्या आहेत. म्हणजे आर्थिक मंदीचे सावट असतानाही व्हेंचर कॅपिटल कंपन्यांनी स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली. यामध्ये फोन पे कंपनीने 650 मिलियन डॉलर बाजारातून उभे केले. तर फ्रेश टू होम या इ कॉमर्स क्षेत्रातील कंपनीने 104 मिलियन डॉलर अॅमेझॉन संभव व्हेंचर कॅपिटलकडून घेण्यात यश मिळवले. Mintifi आणि KreditBee या कंपन्यांनीही 100 मिलियन डॉलरपेक्षा जास्त पैसे मिळवले. मात्र, ही काही बोटावर मोजण्याएवढी उदाहरणे आहेत. इतर कंपन्यांना मात्र, पैसे उभे करता आले नाही.

पहिल्या तीन महिन्यात सर्वात कमी फंडीग

असे असतानाही जानेवारी 2023 ते मार्चपर्यंत स्टार्टअप कंपन्यांनी 3.83 बिलियन डॉलर बाजारातून मिळवले. मात्र, मागील वर्षाचा विचार करता ही रक्कम 72 टक्क्यांनी कमी आहे. याच काळात मागील वर्षी स्टार्टअप कंपन्यांनी 13.8 बिलियन डॉलर रक्कम उभी केली. 2019 पासून स्टार्टअप कंपन्यांना झालेल्या फंडींगचा विचार करता यावर्षी जानेवारी ते मार्चमध्ये सर्वात कमी पैसे मिळाले.

स्टार्टअपमधील फंडीग कमी होण्यामागील कारणे?

1) जागतिक मंदीसदृश्य परिस्थितीमुळे गुंतणूकदार साशंक आहे. माहिती तंत्रज्ञान आणि इ कॉमर्स क्षेत्रातील कंपन्या आधीच अडचणींचा सामना करत आहेत. त्यामुळे टेक्नॉलॉजी स्टार्टअपमध्ये गुंतवणूक कमी झाली आहे.

2) कोरोनाकाळात कृत्रिमरित्या वाढलेली वस्तू आणि सेवांची मागणी कमी आता कमी झाली आहे. परिणामी उद्योगांचा व्यवसायही रोडावला आहे. त्याचा परिणाम कंपनीच्या बॅलन्स शीटवर पडला आहे.

3) स्टार्टअप कंपन्यांच्या फक्त महसूलात फुगवटा, नफा मात्र कमी.

4) व्यवसायाचे कामकाज आणि भविष्यातील नियोजनाबाबत स्पष्टता नाही.

5) एखाद्या क्षेत्रामध्ये आधीपासून स्पर्धा असल्यामुळे स्टार्टअप कंपनीला ग्राहकांना आकर्षित करणे अधिक कठीण होऊन बसते. पूर्वीपासून मार्केट लिडर असणाऱ्या कंपन्यांशी स्पर्धा न करू शकते. यामुळे गुंतवणूकदार स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्यास तयार होत नाही.