Power Demand In India: भारतामध्ये मागील काही वर्षांपासून ऊर्जेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. उद्योग धंद्यांची वाढ हे एक महत्त्वाचे कारण आहे. मात्र, त्याचबरोबर इतरही अनेक कारणे आहेत, ज्यामुळे ऊर्जेचे व्यवस्थापन नीट होत नाही. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये विजेचा तुटवडा जाणवतो. ग्रामीण भागात लोडशेडिंग करण्याची वेळ येते. नवीकरणीय ऊर्जा स्रोतांपासून मिळणाऱ्या ऊर्जेचे प्रमाण वाढत आहे. मात्र, अद्यापही कोळसा हाच ऊर्जा निर्मितीसाठी प्रामुख्याने वापरला जातो.
ज्या राज्यांमध्ये उद्योग व्यवसायांची संख्या जास्त आहे, आर्थिक उलाढाल जास्त आहे. त्या राज्यांमध्ये तर ऊर्जेची गरज तुलनेने जास्त असते. 2022 वर्षात भारताची विजेची गरज मागील वर्षाच्या तुलनेत 8% वाढली. आशिया खंडातील देशांमधील हा दर सर्वाधिक आहे. तसेच 2023 वर्षातील पहिल्या दोन महिन्यांमध्ये 2022 शी तुलना करता विजेची मागणी 10% पेक्षा जास्त वाढली आहे.
विजेची मागणी वाढण्याची कारणे काय? (Reason behind High electricity demand)
ज्या राज्यांचा विकास दर जास्त आहे त्या राज्यांमध्ये भारतात विजेची मागणी वाढत आहे. यामध्ये प्रामुख्याने राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात राज्यात विजेची मागणी जास्त आहे. पूर्वेकडील छत्तीसगड राज्यात मागील पाच महिन्यात विजेची मागणी 16.6% वाढली आहे. तर याच कालावधीत राजस्थानात 15.1% वाढली आहे. छत्तीसगड सारखी राज्ये प्रगती करत असल्याचे यातून दिसून येत आहे.
शेती कामांसाठी पंजाब राज्यातील विजेचा वापरही वाढत आहे. तर तेलंगणा, बिहार आणि मध्यप्रदेश राज्यात घरगुती विजेचा वापर सर्वाधिक जास्त होतो. अर्थव्यवस्थेची वाढ होत असल्याने देशात विजेची मागणी वाढल्याचे अर्थमंत्री निर्मला सितारामन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले आहे. भारताला लागणाऱ्या एकूण विजेपैकी निम्म्यापेक्षा जास्त ऊर्जा उद्योगधंदे आणि कामर्स अॅक्टिव्हिटीसाठी वापरली जाते.
विजेचा वापर सिझननुसारही बदलो
उष्णेतेची लाट आणि कोरोनाचे निर्बंध उठवल्यामुळे 2022 च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये विजेची मागणी वाढली होती. तसेच पिकांच्या हंगामानुसारही राज्यांना लागणाऱ्या विजेची गरज कमी जास्त होते. आंध्रप्रदेशात उद्योगांसाठी विजेची मागणीही वाढली आहे. (High electricity demand) भारताची सिलिकॉन व्हॅली समजल्या जाणाऱ्या कर्नाटकातील बंगळुरुमध्ये कर्मचारी कोरोनानंतर पुन्हा परतले आहेत. त्यामुळे कर्नाटकाची विजेची मागणीही वाढली आहे. पंजाब राज्यात सरकारकडून मोफत वीज देण्याची योजना आहे. त्यामुळेही तेथेही विजेची मागणी वाढत आहे.
उन्हाळ्यात पावर ब्लॅक आऊट होणार का?
भारतामध्ये उन्हाळ्यात सर्वाधिक विजेची मागणी असते. या काळात ऊर्जेचा तुटवडा भासू नये यासाठी ऊर्जा मंत्रालयाकडून उन्हाळ्याच्या आधीपासूनच तयारी केली जाते. रात्रीच्या वेळी सोलार ऊर्जा उपलब्ध नसते. ही गरज भरुन काढण्यासाठी थर्मल आणि जलविद्युत ऊर्जेचे प्रमाण मागील काही वर्षात वाढवण्यात आले नाही. त्यामुळे यंदाही ग्रामीण भागाला लोडशेडिंगचा भार सोसावा लागेल, असे दिसत आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            