Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Business in Singapore: भारतीय स्टार्टअप कंपन्या सिंगापूरमध्ये नोंदणी करण्यास प्राधान्य का देतात? जाणून घ्या कारणे

Business in Singapore

Business in Singapore: सिंगापूरमध्ये व्यवसायाची नोंदणी केल्यास परदेशी व्यक्तीला कंपनीच्या स्टॉकच्या 100% मालकीची परवानगी दिली जाते. सिंगापूरमध्ये व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही स्थानिक भागीदार किंवा भागधारकांची गरज भासत नाही. एवढेच नाही तर GST आणि Corporate Tax मध्ये मोठी सवलत दिली जाते, जाणून घ्या सविस्तर...

व्यवसायासाठी अनुकूल वातावरण, धोरणात्मक भौगोलिक  स्थान आणि फायदेशीर व्यापार कायदा या तीन कारणांमुळे जगभरातील कंपन्या सिंगापूरची निवड करताना दिसतात. इंडिया ब्रीफिंगच्या अहवालानुसार, 2000 पासून 8,000 हून अधिक भारतीय कंपन्यांनी सिंगापूरमध्ये नोंदणी केली आहे. अनेक कंपन्यांनी तर सिंगापूरमध्ये कार्यालय न सुरु करता ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय नोंदणी केली आहे. म्हणजेच कंपनीची नोंदणी सिंगापूरमध्ये पण कामकाज मात्र भारतात! होय, असं घडतंय! या मागची कारणे देखील तशीच आहेत. चला तर जाणून घेऊया नेमके सिंगापूरमध्ये असं काय आहे, ज्यामुळे व्यावसायिक कंपन्या या देशाची निवड करतात.

व्यवसाय नोंदणीसाठी सिंगापूर ही लोकप्रिय निवड का आहे याची काही कारणे येथे देत आहोत:

व्यवसायासाठी अनुकूल वातावरण

सिंगापूर हे व्यवसायासाठी अनुकूल वातावरण आणि व्यवसाय करण्याच्या सुलभतेसाठी ओळखले जाते. परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी हा देश व्यावसायिकांना मोठ्या कर सवलती देतो. लहान आणि मध्यम आकाराच्या उद्योगांना समर्थन देण्यासाठी सरकार विविध अनुदान आणि योजना देखील प्रदान करते, त्यामुळे या देशाला व्यावसायिक लोक पसंती देतात. कॉर्पोरेट कराचा विचार केल्यास, भारतीय कंपन्यांना वर्षाला 30% कॉर्पोरेट कर द्यावा लागतो तर हाच कर सिंगापूरमध्ये 17% इतका आहे. त्यामुळे ही कर सवलत मिळवण्यासाठी भारतीय व्यावसायिक देखील सिंगापूरला पसंती देताना दिसत आहेत. 

सोबतच भारतात 5 ते 28% GST असून सिंगापूरमध्ये 7-8% GST आहे.सिंगापूरमध्ये जीएसटी कमी आहेच परंतु जीएसटी करप्रणाली देखील सोपी आहे. कंपन्यांची नोंदणी आणि नियामक प्रक्रिया सुलभ आणि कमी खर्चिक असल्यामुळे व्यावसायिकांच्या आवडीचे ठिकाण म्हणून या देशाला ओळखले जाते.

मोक्याचे भौगोलिक ठिकाण

सिंगापूर धोरणात्मकदृष्ट्या दक्षिणपूर्व आशियाच्या मध्यभागी आहे. या भौगोलिक स्थानाचा फायदा येथील कंपन्यांना होताना दिसतो. अलिकडच्या काळात, सिंगापूर ‘आशियाची सिलिकॉन व्हॅली’ म्हणून उदयास आले आहे. स्टार्टअप कंपन्यांना आवश्यक त्या सुविधा देण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे. स्टार्टअप्ससाठी अनुकूल कर प्रणाली देणारा हा देश म्हणूनच व्यापाऱ्यांच्या आवडीचा देश बनला आहे.

सिंगापूरमध्ये व्यवसायाची नोंदणी केल्यास परदेशी व्यक्तीला कंपनीच्या स्टॉकच्या 100% मालकीची परवानगी दिली जाते. सिंगापूरमध्ये व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही स्थानिक भागीदार किंवा भागधारकांची गरज भासत नाही.

स्टार्टअप ब्लिंकच्या ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टम इंडेक्स 2022 नुसार सिंगापूर आशियामध्ये प्रथम आणि जागतिक स्तरावर सातव्या क्रमांकावर आहे.सिंगापूरमधील राजकीय स्थिरता हे देखील एक महत्वाचे कारण आहे. सिंगापूर देश हा राजकीय स्थिरता आणि कमी  भ्रष्टाचारासाठी ओळखला जातो. इथली न्यायव्यवस्था देखील पारदर्शी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे पारदर्शी आणि कार्यक्षम सरकार सर्वसामान्य आणि लघु व मध्यम व्यावसायिकांना फायदेशीर ठरतील अशी धोरणे आणण्याचा प्रयत्न करताना दिसते.