• 02 Oct, 2022 09:20

21 जूनलाच ‘International Yoga Day’ का साजरा करतात?

YOGADAY 2022

International Yoga Day 2022 : योगासनाची पाळेमुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अगदी पूर्वापार काळांपासून रूजलेली आहेत. ती आता संपूर्ण जगभर लोकप्रिय होत आहेत. योगासने कोणत्याही वयात आणि कोणीही करू शकतो.

भारतीय संस्कृतीतील अध्यात्मिक विज्ञानानुसार माणसाचे शरीर सदृढ राहण्यासाठी अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश असे पंचकोश सांगितले आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी हे पाच कोश महत्त्वाचे मानले जातात. या पाच कोशांचा समतोल राखण्यासाठी आणि त्यांची नियमित क्रिया सुरळितपणे सुरू राहण्यासाठी योगासने (Yoga) अत्यंत महत्त्वाची आहेत. योगासनामधील विविध आसनांमुळे फक्त शरीराचाच नाही तर मनाचा विकास (Physical & Mental Development ) होत आहे. मनातील सकारात्मक विचारांमुळे अनेकांच्या आर्थिक विकासात वाढ (Financial Development) होत असल्याचे दिसून येत आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी सुरू झाला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेत (UN General Assembly) केलेल्या भाषणादरम्यान, 'योग दिना'बाबत सूचना (International Yoga Day Information) मांडली होती. त्यानंतर भारताने प्रस्ताव ही सादर केला होता. त्या प्रस्तावाला जगभरातील 177 सदस्य देशांनी विक्रमी मतदानाने मान्यता दिली. त्यानंतर 21, जून 2015 रोजी जगभरात पहिला ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ (International Yoga Day) साजरा करण्यात आला.


योग दिवस का साजरा केला जातो? 

योग ही भारताच्या प्राचीन परंपरेची अमूल्य देणगी मानली जाते. या प्राचीन अभ्यासात मन आणि शरीराची समानता ठेवण्याची ताकद आहे. विचार आणि कृती यांची सांगड घालणारा, तसेच मनुष्य आणि निसर्ग यांच्यातील समतोल राखणारा, मनुष्याच्या सर्वांगिण विकासासाठी समग्र दृष्टीकोन देणारा अभ्यास आहे. योगासनांमुळे आपली जीवनशैली बदलून, शरीरात नवीन चेतना निर्माण होण्यास मदत होते. आणि याचे महत्त्व संपूर्ण जगाला पटत असल्याने संपूर्ण जगभर योग दिवस (Yoga Day 2022 Celebration) साजरा केला जातो.


21 जून हा योग दिवस म्हणून का साजरा केला जातो?

21 जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. त्यामुळे या दिवसाचे स्वत:चे एक वेगळेपण आहे. म्हणूनच हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावास अनेक देशांनी मान्यता दिल्याने 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

2022 या वर्षाची योग दिवसाची थीम काय आहे?

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दरवर्षी एक थीम ठरवली जाते. त्या थीमनुसार हा दिवस साजरा केला जातो. 2021 मध्ये “be with yoga be at home” ही थीम होती. तर या वर्षी म्हणजेच 2022 या वर्षाची थीम (International Yoga Day Theme 2022) “yoga for humanity”  अशी आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आतापर्यंतच्या थीम | International Yoga Day Theme

  • 2015: सुसंवाद आणि शांततेसाठी योग
  • 2016: शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योग
  • 2017: आरोग्यासाठी योग
  • 2018: शांततेसाठी योग
  • 2019: हृदयासाठी योग
  • 2020: घरी योग आणि कुटुंबासह योग
  • 2021: योगासने करत राहा आणि घरी राहा


पूर्वापार चालत आलेले योगासनांचे महत्त्व

मानवी शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी 5व्या शतकापासून भारतात योगासने फायदेशीर ठरत आहेत. योग आसनांमुळे माणसाचे शरीर मजबूत आणि लवचिक बनते, एकूण आरोग्य सुधारते. योगासनांमुळे शरीराबरोबरच मनाचाही विकास होतो. प्राणायम हा पद्धतीमुळे माणसाच्या शरीराचे आंतरिक शुद्धीकरण होत असल्याचे संपूर्ण जगाने मान्य केले आहे. योगासनांच्या विविध शारीरिक आसनांमुळे शरीरात एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा निर्माण होते. या ऊर्जेचे नंतर स्थिरता, शांतता आणि शरीर प्रसन्न ठेवण्यासाठी उपयोग होतो.

शारीरिक स्वास्थासोबतच आर्थिकदृष्ट्याही फीट रहा!

आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शारीरिकदृष्ट्या फीट राहण्यासाठी तुम्ही नक्कीच योगासने सुरू कराल, असा आम्हाला विश्वास आहे. पण त्याचबरोबर तुमचे आर्थिक स्वास्थ्य ही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने आर्थिक फीट राहण्यासाठी प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही प्रश्न घेऊन आलो आहेत. या प्रश्नांवरून तुम्हाला तुमचा आर्थिक फिटनेस पडताळण्यास मदत होईल. 

International yoga Day 2022

1. तुम्ही आर्थिक नियोजन (Financial Planning) करता का?
2. पगारातील 10 ते 30 टक्के रकमेची बचत करता का?
3. किमान 6 महिन्यांसाठी आपत्कालीन निधी (Emergency Fund) तयार केला आहे का?
4. तुम्ही तुमचा पुरेसा आरोग्य विमा काढला आहे का?
5. तुमच्या अवलंबून असलेल्यांसाठी आरोग्य विमा पुरेसा आहे का?
6. तुमचा आरोग्य विमा आणि गुंतवणूक वेगवेगळी आहे का?
7. महिन्या पगारातून किती टक्के लोन रिपेमेंट करता?
8. तुमचा आर्थिक पोर्टफोलिओ बॅलन्स आहे का?
9. तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर आकारल्या जाणाऱ्या टॅक्सबद्दल माहिती आहे का?
10.तुम्ही निवृत्तीनंतरच्या पेन्शन प्लॅनचा विचार केला आहे का?

वरील 10 प्रश्नांपैकी 9 ते 10 प्रश्नांची तुमच्याकडे ठोस उत्तरे असतील तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आहात. 6 ते 8 प्रश्नांची उत्तरे असतील तर तुम्ही सृदृढ आहात; पण अजून मेहनत घ्यावी लागणार आहे. 3 ते 5 प्रश्नांची उत्तरे असतील तर याचा अर्थ असा होती की, तुम्ही आत्ताच सुरूवात केली आहे. तुम्हाला अजून प्रयत्न करायला हवेत. आणि जर तुमच्याकडे एकाही प्रश्नाचे उत्तर नाही किंवा फक्त 2 प्रश्नांची उत्तरे आहेत तर, तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आतापासूनच सुरूवात करण्याची गरज आहे.