Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Emergency Fund: आपत्कालीन निधी म्हणजे काय आणि तो किती असावा?

Emergency Fund: आपत्कालीन निधी म्हणजे काय आणि तो किती असावा?

Image Source : www.linkedin.com

Emergency Fund Planning: आर्थिकदृष्ट्या आपल्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतर भविष्यात उद्भवणाऱ्या संकटाची चाहुल म्हणून प्रत्येकाने स्वत:चा आपत्कालीन निधी तयार केला पाहिजे. तो कसा आणि का करायचा हे आपण समजून घेणार आहोत.

कोणतेही संकट सांगून येत नाहीत, ते आलं की बऱ्याच जणांची पाचावर धारण बसते. कारण अचानकपणे आलेल्या या संकटाला ऐनवेळी तोंड देण्याची आपली तयारी नसते. अचानकपणे नोकरी जाणे, कुटंबात मोठा अपघात होणे किंवा गंभीर आजारी पडणं अशा संकटाला आर्थिकदृष्ट्या धैर्याने सामोरे जाण्यासाठी आपत्कालीन निधी तयार करणं ही काळाची गरज आहे आणि आर्थिक नियोजनाचा मुख्य भाग आहे. आपत्कालीन निधीला आपण वाईट दिवसांसाठी साठवलेला फंड किंवा निधी म्हणू शकतो.

साध्य व सोप्प्या टप्प्यांमध्ये  तुम्ही आपत्कालीन निधी तयार करू शकता
 आपले जीवन अनपेक्षित आश्चर्यांनी भरलेले असते. त्यामुळे अचानकपणे पैसे खर्च होण्याची कारणेही बरीच असतात. जसे की, तुमचा मुलगा आजारी पडू शकतो, तुमच्या गाडीचा अपघात होऊ शकतो. अशावेळी साठवून ठेवलेल्या पैशांचा वापर करण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो. पण अशावेळी पुरेसा पैसा हातात नसेल तर आधीच आलेल्या संकटापेक्षा पैसे नसल्याच्या संकटाने माणूस आणखी हवालदिल होऊन जातो. ही परिस्थिती टाळण्यासाठी आपत्कालीन निधी उभारण्यासाठी सुरूवात केली पाहिजे.

आपत्कालीन निधी म्हणजे काय?

आपत्कालीन निधी म्हणजे कोणत्याही संकटाच्या काळात तुमचा 3 ते 6 महिन्यांचा खर्च ज्याच्याद्वारे भागवला जातो, त्याला आपत्कालीन निधी म्हणतात. काही खर्च आपण ठरवूनही टाळू शकत नाही. अशा वेळी आपला नेहमीचा आर्थिक स्त्रोत बंद झाल्यावर आपण जो साठवून ठेवलेला निधी वापरतो, त्याला आपत्कालीन निधी म्हटले जाते.


आपत्कालीन निधीचे फायदे काय?

ऐनवेळी आलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी आपण साधारणत: नातेवाईक किंवा आपल्या ओळखीच्या लोकांकडून मदत घेतो. तर काही वेळेस अंगावरील दागिने विकले जातात. फिक्सड् डिपॉझिट मोडतो आणि पैसे उभे करतो. पण आपण जर योग्य नियोजन करून आपला स्वत:चा आपत्कालीन निधी उभा करू शकलो तर आपल्यावर अशी दुसऱ्यांकडे पैसे मागण्याची किंवा बचत केलेल्या ठेवी मोडण्याची वेळ येणार नाही. आपत्कालीन निधीमुळे तुम्ही संकटकाळातही निश्चित राहून योग्य मार्ग काढू शकता.

आपत्कालीन निधी किती असावा?

आपत्कालीन निधी हा प्रत्येक व्यक्तीच्या राहणीमान आणि गरजांवर अवलंबून असतो. तरीही अचानकपणे आलेल्या संकटातून सावरण्यासाठी किमान 3 ते 6 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. अशावेळी इतक्या दिवसांचा तुमचा दैनंदिन खर्च पुरू शकेल इतका निधी असावा. यात तुमचे सर्व महत्त्वाचे खर्च समाविष्ट करून तुम्हीच तुमचा आपत्कालीन निधी ठरवणे योग्य ठरू शकते.

सध्याच्या परिस्थितीत कोणता खर्च अचानक वाढेल हे तुम्ही सांगू शकत नाही. यात मुलांच्या शाळेची फी, होम लोनचा ईएमआय किंवा एखादे मोठे ऑपरेशन असे काहीही असू शकते. अशावेळी आपत्कालीन निधीतून वेळोवेळी काढला जाणारा निधी पुन्हा भरणेही आवश्यक असते.