नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हिंडेनबर्गच्या अहवालात गौतम अदानी यांचे मोठे बंधू विनोद अदानी यांच्या नावाचाही समावेश आहे. अहवालात त्यांच्यावर देखील आरोप करण्यात आला आहे. आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून ज्यांची ओळख होती असे गौतम अदानी यांची श्रीमंती रोजच्या रोज मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेले अदानी आत्ताच 16 व्या क्रमांकावर गेले आहेत. शेअर्समधील घसरण तर सुरूच आहे. अमेरिकन फर्म हिंडेनबर्गच्या अहवालानंतर ते वादात सापडले आहेत आणि त्यांच्यासमोर मोठे आर्थिक आव्हान उभे राहिले आहे. .
गौतम अदानी यांचे मोठे भाऊ आहेत विनोद
या संपूर्ण प्रकरणात अदानी यांच्या सोबतच विनोद अदानी यांच्यावरही विविध आरोप होत आहेत. विनोद अदानी हे गौतम अदानी यांचे मोठे भाऊ आहेत. ते दुबईत राहतात. दुबई, सिंगापूर आणि जकार्ता येथे अनेक कंपन्या ते मॅनेज करतात. नुकत्याच जाहीर झालेल्या IIFL Wealth Hurun India Rich List 2022 नुसार, विनोद शांतीलाल अदानी यांचा सर्वात श्रीमंत NRI म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.
विनोद अदानी यांच्यावर आहे 'हा' आरोप
हिंडेनबर्गच्या ताज्या अहवालात विनोद अदानी यांच्या नावाचाही समावेश आहे. विनोद हे ऑफशोअर शेल कंपन्यांचा एक मोठा चक्रव्यूहच सांभाळत असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. तसेच, या कंपन्यांच्या माध्यमातून बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. हिंडेनबर्ग अहवालानंतर विविध प्रकारची आव्हाने गौतम अदानी आणि त्यांच्या कुटुंबासमोर उभी राहिली आहेत. RBI ने तर बँकांकडून Adani Group वर असणाऱ्या कर्जाचे डिटेल्सही मागितले आहेत.