पर्यटन करणे, नवी शहरे बघणे आता सर्वसामान्य बनले आहे. वेगवगेळ्या सरकारी योजना देखील पर्यटनाला प्रोत्साहन देताना दिसत आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने याबाबत मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. भारतातच पर्यटन वाढावे आणि नागरीकांनी आपला देश बघावा आणि त्यानिमित्ताने रोजगाराच्या संधी देखील वाढणार आहेत.
या सगळ्यात हॉटेल व्यावसायिक देखील चांगली कमाई करताना दिसत आहेत. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे, जगभरातील अनेक शहरांमध्ये हॉटेल खोली भाड्यात प्रचंड वाढ होताना दिसते आहे.
ब्लूमबर्गचा अहवाल
ब्लूमबर्गने याबाबत एक अहवाल सादर केला असून जगभरातील काही शहरांची लिस्ट प्रकाशित केली गेली आहे. यामध्ये अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनस आयर्स (Buenos Aires) या शहरातील हॉटेलभाडे सर्वाधिक म्हणजे 17 टक्क्यांपर्यंत वाढू शकते असे म्हटले गेले आहे. या शहरात पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून हॉटेल व्यवसाय तेजीत आहे.
दुसऱ्या क्रमांकावर मुंबई
ब्यूनस आयर्स (Buenos Aires) शहरानंतर हॉटेलच्या बाबतीत सर्वाधिक महाग असलेल्या शहरांत दुसऱ्या क्रमांकावर मुंबई हे शहर आहे. यंदा मुंबई शहरातील हॉटेल्सच्या दरात 15 टक्क्यांनी वाढ होण्याची चिन्हे आहेत. भारतात पर्यटनासाठी येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या देखील वाढत असून हॉटेल व्यावसायिकांच्या महसुलात देखील वाढ होताना दिसते आहे.
भारतातील इतर शहरे!
मुंबईसह भारतातील इतर शहरांचा देखील समावेश आहे. या यादीत मुंबईशिवाय चेन्नई आणि दिल्लीचीही नावे आहेत. चेन्नई शहरात देखील पर्यटनासाठी येणाऱ्या भारतीय आणि विदेशी नागरिकांची संख्या वाढताना दिसते आहे. सर्वाधिक मागणी आणि हॉटेल्सच्या रेटच्या बाबतीत चेन्नई शहर चौथ्या क्रमांकावर असून दिल्ली शहर सातव्या क्रमांकावर आहे. यंदा चेन्नईतील हॉटेल दरात 14.6 टक्के आणि दिल्लीत 12 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.