Gold Loan: सोने हे भारतीयांसाठी फक्त एक धातू किंवा दागिना नाही. तर भारतीय पिढ्यानपिढ्यापासून रोख रकमेसाठी सोन्याची देवाणघेवाण करत आहेत. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्यांसाठी सोनं हा एक चांगला पर्याय आहे. म्हणजे सोनं गहाण ठेवून त्यावर लगेच रोख रक्कम (Gold Mortgage Loan) मिळू शकते. यासाठी खूप साऱ्या कागदपत्रांची गरजही लागत नाही.
पण सोने गहाण ठेवताना किंवा गोल्ड लोन घेताना काही गोष्टींची बेसिक माहिती असणे गरजेचे आहे. नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते. गोल्ड लोन हा सुरक्षित कर्जाचा कॅटेगरीमध्ये येणारा प्रकार असला तरी, ते घेताना स्वत: काही सुरक्षिततेचे नियम पाळणे गरजेचे आहे. तुमच्या कोणत्या प्रकारचे सोने उपलब्ध आहे आणि तुम्ही ते कोणाकडे गहाण ठेवणार आहात. त्यावर व्याजदर काय असणार. याची माहिती तु्म्हाला नसेल तर तुमची फसवणूक होऊ शकतो.
Table of contents [Show]
गोल्ड लोनचे अनेक पर्याय उपलब्ध
सर्वप्रथम तुम्हाला सोने गहाण ठेवून कर्ज घ्यायचे असेल तर तुमच्यासमोर बरेच पर्याय उपलब्ध आहेत. जसे की, तुम्ही राष्ट्रीय बँका, खाजगी बँका, सहकारी बँका, नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFC), ज्वेलर्स, सोन्याची पेढी आणि खासगी सावकर या सर्वांकडून सोन्यावर कर्ज दिले जाते. तसेच या प्रत्येक यंत्रणेची कर्ज देण्याची पद्धत आणि व्याजदर वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे याची संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे.
अधिकृत यंत्रणांकडूनच गोल्ड लोन घ्यावे
सोने तारण ठेवताना एक गोष्टी नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की, ते सोने आपण पुन्हा मिळवणार आहोत. त्यामुळे आपण ज्या किमतीला ते विकत घेतले आहे. तेवढ्या मुल्याचे आपण कर्ज घेणार आहोत का? तसेच सोने तारण ठेवताना आणि ते सोडवून घेताना त्याची शुद्धता तपासणे हे खूपच महत्त्वाचे असते. बऱ्याचदा यातून लोकांची फसवणूक होते. त्यामुळे विश्वासार्ह आणि सरकारने अधिकृतरीत्या परवानगी दिलेल्या यंत्रणांकडूनच गोल्ड लोन घेणे योग्य ठरू शकते.
गोल्ड लोनसाठी बँका उत्तम पर्याय ठरू शकतात
देशातील राष्ट्रीयकृत सरकारी, खाजगी बँकांपासून सहकारी बँकासुद्धा गोल्ड लोन देतात. पण यामध्ये सुरक्षितता म्हणून गोल्ड लोनसाठी सर्वप्रथम राष्ट्रीयकृत सरकारी बँकांना प्राधान्य दिले पाहिजे. या बँकांमधून सोने तारण म्हणून घेताना सोन्याची शुद्धता तपासून घेतली जाते. ते किती कॅरेटचे सोने आहे. त्याची सध्याची मार्केटमधील किंमत काय आहे. हे तपासून त्याचे मूल्य ठरवून ग्राहकाला ते तारण ठेवून नेमके किती रुपये मिळतील, हे सांगतिले जाते. तसेच त्यावर आकारला जाणारा व्याजदर हा देखील महत्त्वाचा भाग आहे. सरकारी बँकांचे व्याजदर तुलनेने कमी असू शकतात.
सोने तारण ठेवणाऱ्या ग्राहकांनीही अशावेळी चाणाक्ष राहून आपल्याकडील सोने नेमके किती कॅरेटचे आहे.तसेच ते सोने किती रुपयांना विकत घेतले होते, हे पडताळून घ्यायला हवे. तसेच सोने तारण ठेवताना बँका त्याचा करारनामा करून घेतात. यामध्ये सर्व गोष्टी नमूद केलेल्या असतात. सोन्याची सुरक्षितता म्हणून या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात.
नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या लगेच गोल्ड लोन देतात
बँकांच्या तुलनेत नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFC)लगेच कर्ज उपलब्ध करून देतात. पण त्यांचा व्याजदर हा बँकांपेक्षा जास्त असू शकतो. तसेच त्यांचे नियमही वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे तुमच्या सोन्याच्या सुरक्षिततेचा विचार करता बँकेतून गोल्ड लोन घेणे योग्य ठरू शकते.
बँका आणि नॉन-बँकिंग कंपन्यांबरोबरच ज्वेलर्स, सोन्याची पेढी चालवणारे सोनार आणि खाजगी सावकारदेखील गोल्ड लोन देतात. पण यांच्याकडून गोल्ड लोन घेताना जोखमीबरोबरच व्याजदरही जास्त द्यावा लागू शकतो. तसेच तारण ठेवलेले सोन्यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता देखील असते. बऱ्याचदा तारण म्हणून ठेवलेल्या 24 कॅरेटच्या सोन्याच्या बदल्यात ग्राहकांना ते परत कराना 23 किंवा 18 कॅरेटच्या रुपात दिले जाते.
अशाप्रकारे सोन्याची फसवणूक होण्याची शक्यता आणि अव्वाच्या सव्वा आकारला जाणारा व्याजदर हे खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. याची सुरक्षितता पडताळून, तपासून योग्य निर्णय घ्यावा.