Gold Loan: देशात सुवर्ण कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. खासगी आणि सार्वजनिक बँकांमधून अशा कर्जांची वाटप वाढली आहे. भारतात सोन्याला पारंपरिक दृष्टीकोनातूनही महत्त्व आहे. त्यामुळे सोने तारण ठेवून घेतलेले कर्ज बुडीत निघण्याचे प्रमाणही कमी आहे.
सोने तारण कर्ज 28 टक्क्यांनी वाढले
जून 2023 पर्यंतच्या आकडेवारीचा विचार करता मागील वर्षाच्या तुलनेत सुवर्ण कर्ज 28 टक्क्यांनी वाढले आहे. असे कर्ज बुडीत निघण्याचे प्रमाणही कमी असल्याने बँकाचा कल सुवर्ण कर्ज देण्याकडे आहे. सुवर्ण कर्जावरील व्याजदर स्पर्धात्मक आहेत. इतर कर्जांच्या व्याजदरापेक्षा कमी असल्याने ग्राहक पैशांची गरज सोने तारण कर्जातून भागवत आहेत.
कृषी गोल्ड लोनचाही पर्याय
स्टेट बँक ऑफ इंडिया वैयक्तिक सोने कर्जावर 8.70% ते 9.80% व्याजदर आकारते. कोणत्या गोष्टींसाठी गोल्ड लोन पाहिजे, त्यावरून व्याजदर आकारला जातो. कोरोना प्रसार होण्याआधी खासगी क्षेत्रातील बँका गोल्ड लोन देण्यात आघाडीवर होत्या. मात्र, सार्वजनिक क्षेत्रातील बँकाही स्पर्धेत पुढे आल्या आहेत. तसेच सरकारद्वारे प्रायोरिटी सेक्टर लेंडिग (PSL) करणे बँकांना अनिवार्य आहेत. त्यामुळे शेतीच्या कामांसाठी किंवा कृषी उद्योजकांसाठीही कृषी गोल्ड लोन ऑफर बँकांकडून दिल्या जातात.
गोल्ड लोनची एकूण रक्कम किती?
देशात सोने कर्जाची एकूण रक्कम 95,347 कोटींवर पोहचली आहे. पुढील काही महिन्यात 1 लाख कोटींचा टप्पा गाठेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. भारतात प्रत्येक घरात थोडेतरी सोने असते. वैयक्तिक, व्यावसायिक किंवा इतरही निकड भागवण्यासाठी सोने कर्ज घेतले जाते. हे कर्ज बुडीत निघण्याची शक्यताही कमी असते. कारण, सोने गमावण्याची भीती असल्याने कर्जाची परतफेड होते.
सोने कर्जातून बँकांना फायदा कसा?
इतर कर्जांपेक्षा सोने कर्ज बुडीत निघण्याचे प्रमाण कमी आहे. तसेच जरी असे कर्ज बुडीत निघाले तर तारण ठेवलेल्या सोन्याचा लिलाव करून बँक तत्काळ पैसे वसूल करते. ही प्रक्रिया इतर तारण मालमत्ता विक्री करण्यापेक्षा जलद असल्याने बँकांही गोल्ड लोन वर लक्ष केंद्रित करत आहेत.