भविष्य निर्वाह निधीच्या खातेदारांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आली आहे. जर तुमच्या पगारातून पीएफचे पैसे कापले जात असतील आणि तुम्ही त्यावर मिळणाऱ्या व्याजाची वाट बघत असाल तर त्याबाबतचे एक महत्वाचे अपडेट समोर आले आहे. लवकरच EPFO खातेदारांना त्यांच्या व्याजाचे पैसे पीएफ खात्यात जमा करून देणार आहे. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) मंडळाने निश्चित केलेल्या EPF वर 8.15% व्याजदराला वित्त मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. याचाच अर्थ पीएफ मधील गुंतवणुकीवर ग्राहकांना यावर्षी घवघवीत 8.15% व्याजदर मिळणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यापासून ईपीएफ खातेधारकांच्या खात्यात व्याजाचे पैसे येणे सुरू होईल. टप्प्याटप्प्याने विविध विभागांसाठी ही योजना राबविण्यात येणार असून त्यानुसार वेगवगेळ्या राज्यातील खातेदारांना त्यांच्या खात्यात व्याजाचे पैसे जमा होणार आहेत. या प्रकरणात एक गोष्ट लक्षात असू द्या की, पीएफ वरील व्याजाचे पैसे ग्राहकांना वेळेवर मिळत नाही. याचे कारण म्हणजे EPFO खातेदारांच्या नोकरीत होणारे बदल तसेच कर्मचाऱ्यांची निवृत्ती. एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत रुजू होताना झालेले बदल, अथवा निवृत्तीच्या वेळी पीएफमधून काढलेले पैसे यामुळे EPFO ला ताळमेळ साधण्यास, ऑडीट करण्यास बराच कालावधी लागतो. त्यामुळे व्याजाचे पैसे खातेधारकांना वेळेवर मिळण्यात अडचणी येत असतात.
7 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळेल फायदा
भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक केलेल्या देशभरातील जवळपास 7 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना व्याज मिळणार आहे. EPFO खात्यात कर्मचारी आणि नियोक्ता दोघांचेही योगदान असते. यामध्ये मूळ पगार (Basic Pay) आणि महागाई भत्ता (DA) मिळून 24 टक्के रक्कम जमा केली जाते. EPFO च्या नियमानुसार खातेधारकांना वार्षिक आधारावरच व्याजदर दिले जाते. म्हणजेच आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी जरी कुणी खातेधारकांनी पैसे काढल्यास त्यांचे 12 महिन्यांचे व्याज कापले जाते. त्यामुळे ज्यांनी 12 महिने पीएफ खात्यांमधून पैसे काढले नसेल अशांनाच या व्याजदराचा फायदा मिळतो.
तुमच्या खात्यात जमा केलेले पैसे याप्रमाणे तपासा:
- तुमच्या पीएफ खात्यात जमा केलेली रक्कम तपासण्यासाठी प्रथम EPFO च्या वेबसाइट epfindia.gov.in वर जा.
- येथे आमच्या सेवांमध्ये ड्रॉपडाउन करून 'कर्मचाऱ्यांसाठी' हा पर्याय निवडा.
- त्यानंतर सदस्य पासबुकवर क्लिक करा. येथे UAN नंबर आणि पासवर्ड सबमिट करून लॉग इन करा.
- आता तुमचे पीएफ खाते निवडा. तो उघडताच खात्यातील शिल्लक तुमच्या समोर येईल.
मेसेज पाठवून खात्यातील शिल्लक तपासा!
यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून EPFOHO UAN ENG टाइप करून 7738299899 वर पाठवा.तुम्हांला काही वेळातच EPFO कडून तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कम सांगणारा मेसेज पाठवला जाईल.