रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच 2000 रुपयांची नोट चलनातून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सामान्य नागरिकांना आणि देशभरातील बँकांना आरबीआयने काही निर्देश दिले आहेत. उद्यापासून, म्हणजेच 23 मे पासून देशातील बँकांमध्ये नागरीक 2000 रुपयांची नोटा बदलून घेऊ शकतात अथवा त्यांच्या बँक खात्यात जमा करू शकतात. एका वेळेस दोन हजारच्या 10 नोटा नागरिकांना जमा करता येणार आहेत.
आरबीआयच्या घोषणेनंतर देशभरात वेगवगेळ्या चर्चांना उधाण आले आहे. नोटा बदली करताना नागरिकांना ओळखपत्राची किंवा फॉर्म भरण्याची गरज आहे किंवा नाही याबाबत देखील उलटसुलट चर्चा सुरु आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने याबाबत स्पष्टीकरण देत कुठल्याही ओळखपत्राशिवाय पैसे बदलता किंवा जमा करता येणार आहेत असे सांगितले आहे. अशातच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी कुठल्या परिस्थितीत पॅन कार्डची आवश्यकता असणार आहे हे स्पष्ट केले आहे.
कधी द्यावे लागेल ओळखपत्र?
नागरिकांना जशा बँकांमधून 2000 रुपयांच्या नोटा बदली करून मिळणार आहेत तसेच ते बँक खात्यात 2 हजार रुपयांच्या नोटाही जमा करू शकणार आहेत. मात्र, बँक खात्यात जास्तीत जास्त किती नोटा जमा करता येतील, हा प्रश्न अनेकांना पडला होता. यावर स्पष्टीकरण देताना शक्तिकांत दास यांनी महत्वाचा खुलासा केला आहे.
जर एखादी व्यक्ती बँकेत 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी गेली तर त्याला पॅन कार्ड सादर करणे आवश्यक आहे का? असा सवाल विचारल्या नंतर आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की 20,000 रुपयांपर्यंतच्या ठेवी आणि एक्सचेंजेसवर कोणतेही कागदपत्र द्यावे लागणार नाहीये. मात्र, जर कोणी नागरिक 2000 रुपयांच्या नोटांमध्ये 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करत असेल, तर त्याला पूर्वीच्या नियमाप्रमाणेच पॅनकार्ड सादर करणे आवश्यक आहे.
20 लाखांची रोकड काढल्यानंतरही पॅन कार्ड आवश्यक
याबाबत सविस्तर माहिती देताना रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर म्हणाले की, बँकिंग कंपनी, सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील एका आर्थिक वर्षात एक किंवा अधिक खात्यांमधून 20 लाख रुपये काढण्यासाठी देखील पॅन कार्ड आणि आधार कार्ड आवश्यक आहे.
30 सप्टेंबरपर्यंत 2000 च्या नोटा बदलता येणार
23 मे 2023 पासून RBI च्या प्रादेशिक कार्यालयांमध्ये आणि देशभरातील विविध बँकांमध्य 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेता येणार आहेत. 2000 रुपयांच्या नोटा RBI चलनातून काढून टाकणार असली तर या नोटा कायदेशीर चलन म्हणून ग्राह्य धरले जाईल असेही शक्तिकांत दास म्हणाले आहेत. नागरिकांना नोट बदलण्यासाठी पुरेसा वेळ दिला असल्याने नागरिकांनी बँकांमध्ये उगाचच गर्दी करू नये असे देखील ते म्हणाले आहेत.