वस्तू निर्मिती आणि निर्यात या दोन क्षेत्रांमध्ये पुढील काही वर्षात वाढ करण्याचे लक्ष्य भारताने ठेवले आहे. आगामी बजेटमध्ये या दोन क्षेत्रांना सरकारी धोरणातून सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे. कोरोनामुळे चीनची अर्थव्यवस्था मंदावली आहे. बजेटपूर्वी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्ट क्षेत्रातील उद्योग आणि संबंधित विभागांशी चर्चा केली. त्यामध्ये स्थानिक निर्मिती आणि निर्यात उद्योगांना सहकार्याची अपेक्षा असल्याचे एकमताने समोर आले आहे. बजेटमध्ये भारतीय उद्योगांना कशा प्रकारचे सहकार्य मिळते हे पहावे लागेल.
मंदीमुळे चीनची निर्यात रोडावली
चीनच्या अर्थव्यवस्थेची वाढ अपेक्षेपेक्षा कमी वेगाने होण्याची शक्यता आहे. भू-राजकीय घडामोडीमुळे चीनशिवाय इतर पर्याय शोधले जातील. या संधीचा फायदा भारताने घ्यायला हवा. काही भारतीय वस्तूंना परदेशी बाजारातील मागणी कमी होत असल्याची चिंता सरकारी पातळीवर आहे. मात्र, मंदीमुळे निर्यात रोडावली असल्याचे बोलले जात आहे. मंदीमुळे व्यापारात तूटही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बजेटमध्ये निर्यात धोरणात बदल होण्याची अपेक्षा बजेटकडून आहे. तसेच निर्यात करणाऱ्या उद्योगांसाठी सरकारी योजना आणि शुल्कातील कपातीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. निर्मिती क्षेत्राला पुढे नेण्यासाठीही कर कपात, प्रॉडक्शन लिंक्ड इंनसेंटिव्ह वाढवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
निर्यातीतील आव्हाने
चालू आर्थिक वर्षातील एप्रिल-सप्टेंबर दरम्यान भारताच्या निर्यातीत १६.९६ टक्क्यांची वाढ झाली. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही वाढ चांगली आहे. मात्र, बाह्य कारणांमुळे निर्यात कमी होण्याची शक्यता अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी व्यक्त केली आहे. "निर्यातीतील आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण तयार राहायला हवं. जागतिक स्तरावर निर्यातीमध्ये असलेल्या अडचणींचा सामना करण्यासाठी सरकारकडून उद्योगांना मदत मिळले, असे सितारामन म्हणाल्या.
जागतिक व्यापारातील भारताचा हिस्सा
चीनची अर्थव्यवस्था मंदावली असल्याने त्यांची निर्यातही कमी होत आहे. मात्र, याकडे भारताने संधी म्हणून पाहिले पाहिजे. भारतचा जागतिक व्यापारात फक्त 1.7 टक्के हिस्सा आहे. तर चीनचा हिस्सा १२ टक्के आहे. त्यामुळे भारताला यामध्ये वाढ करण्यासाठी मोठी संधी आहे. त्यासाठी बजेटकडूनही अपेक्षा आहेत. भारताला निर्यात आणि निर्मिती क्षेत्रात प्रगती करण्याची मोठ संधी आहे, मात्र, व्हिएतनाम सुद्धा निर्मिती आणि निर्यात उद्योगातील मोठा वाटा घेण्याची क्षमता बाळगून आहे.