इथेरिअम या विकेंद्रीत मुक्त स्त्रोत ब्लॉकचेनने (Decentralised Free source Blockchain) आपले पहिले विलीनीकरण (Merge) 6 सप्टेंबर, 2022 रोजी यशस्वीरीत्या पूर्ण केले. इथेरिअम (Ethereum) ही बिटकॉईन (Bitcoin) नंतरची दुसरी सर्वांत मोठी क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) आहे. इथेरिअमच्या या विलीनीकरणामुळे, क्रिप्टोच्या मायनिंगसाठी लागणाऱ्या बलाढ्य अशा ऊर्जा वापराची गरज कमी होणार असल्याचे सांगितले जाते. चला तर जाणून घेऊयात इथेरिअम विलीनीकरण (Ethereum Merge) काय आहे.
इथेरिअम विलीनीकरण (मर्ज) समजून घेण्याआधी आपल्याला माईननेट (Mainnet) समजून घेणं गरजेचं आहे. माईननेट ही इथेरिअमची प्राथमिक सार्वजनिक उत्पादन असलेली ब्लॉकचेन आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर इथेरिअमच्या ज्या किमती आपण दररोज पाहतो. त्या माईननेट इथेरिअमच्या (Mainnet ETH) किमती असतात.
इथेरिअमच्या या विलीणीकरणामध्ये माईननेटचे (Mainnet) विलीनीकरण बीकॉन चेन (Beacon Chain) यासोबत होणार आहे. यामुळे मायनिंग करताना लागणाऱ्या ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. तसेच यामुळे इथेरिअम स्टेक नेटवर्क (Ethereum Stake Network) अजून सुरक्षित होणार असल्याचे सांगितले जाते. इथेरिअम माईननेट हे प्रूफ-ऑफ-वर्क (Proof-of-Work) या यंत्रणेवर चालते. माईननेटमधील सर्व खाती (Accounts), करार (Contracts) आणि प्रूफ-ऑफ-वर्क या सर्व गोष्टी या यंत्रणेमध्ये सुरक्षित आहेत. तर दुसरीकडे बीकॉन चेन हे प्रूफ-ऑफ-स्टेक या यंत्रणेचा वापर करते. जेव्हा या दोन्ही यंत्रणा एकत्र होऊन प्रूफ-ऑफ-वर्क ही यंत्रणा कायमची बदलून प्रूफ-ऑफ-स्टेक ही यंत्रणा वापरली जाईल तेव्हा इथेरिअमचे विलीनीकरण यशस्वी होईल.
विलीनीकरणानंतर इथेरिअम कॉईन्सना धोका आहे का?
विलीनीकरणामुळे इथेरिअम कॉईन्सना (Ethereum Coins) काहीही धोका नाही. इथेरिअमच्या विलीनीकरणामुळे फक्त प्रूफ-ऑफ-वर्क ही यंत्रणा कायमची बदलली जाणार आहे. परंतु, यामुळे इथेरिअमच्या निर्मितीपासूनच्या इतिहासात कोणताही बदल होणार नाही किंवा त्याला धक्का लागणार नाही. तुमच्याकडे जर इथेरिअम कॉईन किंवा कोणतेही इथेरिअम डिजिटल अॅसेट असतील तर विलीनीकरणाच्या आधी ज्या अवस्थेत होते; त्यात अवस्थेत विलीनीकरणानंतर ही सुरक्षित राहतील. विलीनीकरणावरून सुरू असलेल्या घोटाळ्यांपासून सुरक्षित आणि सावध राहा. तसेच आपले कॉईन अपग्रेड (Upgrade ETH 2.0) करण्यासाठी कोणालाही पाठवू नका, असे आवाहन क्रिप्टोकरन्सी तज्ज्ञांकडून केले जात आहे.
विलीनीकरणाचा दुसरा टप्पा 15 सप्टेंबरला
इथेरिअमच्या विलीनीकरणाचा पहिला टप्पा 6 सप्टेंबर, 2022 रोजी पार पडला. आता दुसरा टप्पा 15 ते 20 सप्टेंबर या दरम्यान होणार आहे. या दोन्ही टप्प्यांमध्ये विलीनीकरण पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या विलीनीकरणामुळे इथेरिअमचे नवीन पर्व (New Era) सुरू होणार असल्याचे इथेरिअमकडून अधिकृतरीत्या सांगितले. यामुळे ऊर्जेची मोठ्या प्रमाणात बचत होणार असून इथेरिअम एक इको-फ्रेंडली क्रिप्टोकरन्सी (Eco-Friendly Cryptocurrency) म्हणून ओळखली जाईल.
इथेरिअम क्रिप्टोकरन्सीचा शिल्पकार ‘बुटेरिन’!
विटालिक दिमित्रीयेविच बुटेरिन (Vitalik Buterin) याने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी आपल्या सहकाऱ्यांसोबत इथेरियम क्रिप्टोकरन्सीची (Ethereum Cryptocurrency) निर्मिती केली. इथेरियम ही आज दुसऱ्या क्रमांकावरील सर्वांत मोठी क्रिप्टोकरन्सी म्हणून ओळखली जाते. इथेरियम क्रिप्टोकरन्सीच्या निर्मितीमागे बुटेरिन याने मोलाची भूमिका बजावली. बुटेरिनचा इथेरियमपर्यंतचा प्रवास रंजक आहे. त्याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी, कोण आहे इथेरियम क्रिप्टोकरन्सीचा शिल्पकार? वाचा.