Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कोण आहे इथेरिअम क्रिप्टोकरन्सीचा शिल्पकार?

Ethereum crptocurrency

इथेरिअम (Ethereum) ही आज क्रिप्टो मार्केटमधील दुसऱ्या क्रमांकावरील सर्वांत मोठी क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) म्हणून ओळखली जाते.

विटालिक दिमित्रीयेविच बुटेरिन (Vitalik Buterin) याने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी, गॅव्हिन वूड, चार्ल्स हॉस्किन्सन, अँथनी डी इओरियो आणि जोसेफ लुबिन या सहकाऱ्यांसोबत इथेरिअम क्रिप्टोकरन्सीची (Ethereum Cryptocurrency) निर्मिती केली. इथेरिअम ही आज दुसऱ्या क्रमांकावरील सर्वांत मोठी क्रिप्टोकरन्सी म्हणून ओळखली जाते. इथेरिअम क्रिप्टोकरन्सीच्या निर्मितीमागे बुटेरिन यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. जाणून घेऊयात बुटेरिन याचा इथेरिअमपर्यंतचा प्रवास.


विटालिक बुटेरिन याचा जन्म 31 जानेवारी, 1994 मध्ये रशियामधील कोलोम्ना (Kolomna, Russia) येथे झाला. त्यांचे वडील संगणक वैज्ञानिक (Computer Scientist) होते. बुटेरिन 6 वर्षाचे असताना त्यांचे कुटुंब रोजगाराच्या शोधात कॅनडा देशात स्थलांतरित झाले होते. बुटेरिन यांचे गणित, प्रोग्रामिंग आणि अर्थशास्त्र या विषयात विशेष आकर्षण होते. बुटेरिन यांनी अबेलर्ड स्कूल (Abelard school) या खाजगी शाळेत शिक्षण पूर्ण केले. बुटेरिन यांनी पुढील शिक्षण वॉटरलू विद्यापीठातून घेतले. तिथे ते इयान गोल्डबर्ग (Ian Goldberg) यांचे संशोधन सहायक होते.

बुटेरिन यांना क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) आणि बिटकॉईन (Bitcoin) बद्दलची माहिती त्यांच्या वडिलांकडून मिळत होती. 2013 मध्ये बुटेरिन यांनी अनेक देशांत फिरून कोडींग डेव्हलपर्सची भेट घेतली आणि त्याच वर्षी टोरोंटो येथे परत आल्यानंतर त्याने इथेरिअमवरील व्हाईट पेपर प्रसिद्ध केला. यासाठी त्याने त्याचे शिक्षण अर्धवट सोडून संपूर्ण वेळ इथेरिअमच्या कामासाठी दिला. बुटेरिनला या कामासाठी पीटर थिएल (Peter Thiel) या भांड्वलदाराकडून 10 लाख डॉलर्स (भारतीय चलनात 6 कोटी रूपये) भत्ता म्हणून मिळाले होते. या निधीच्या जोरावर बुटेरिनने इथेरिअमचे काम अजून जोमाने सुरू केले.

बुटेरिनने प्रसिद्ध केलेल्या इथेरिअमच्या व्हाईट पेपरने लोकांचे लक्ष वेधून घेतले. 2014 रोजी एका इथेरिअम कॉईनचे मूल्य 0.31 डॉलर (18.6 रूपये) होते. ते आजच्या घडीला 4891.7 डॉलर (3,82,702.15 रूपये) इतक्या उच्चांकावर पोहोचले आहे. इथेरिअमचे क्रिप्टो बाजारातील भांडवल सुमारे 130.899 बिलियन डॉलर (अंदाजित 1 लाख 1 हजार कोटी रूपये) इतके आहे.

इथेरिअमच्या या यशामागे फक्त बुटेरिन याचा एकट्याचाच हात नाही; त्याचे सहकारी गॅव्हिन वुड, चार्ल्स हॉस्किन्सन, अँथनी डी इओरियो आणि जोसेफ लुबिन यांचाही वाटा मोठा आहे. इथेरिअम या एका क्रिप्टोकरन्सीद्वारे यांनी अनेक नवनवीन संकल्पना जगासमोर आणल्या. त्याचबरोबर अनेक देशांमधील गरजू लोकांना आर्थिक मदत ही केली. बुटेरिन याचा हा प्रवास पाहता, एक सामान्य मनुष्य विज्ञानाच्या बळावर काय करू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे.