• 02 Oct, 2022 08:20

धक्कादायक! बिटकॉईन गुंतवणुकीचे निम्मे व्यवहार बनावट, क्रिप्टो मार्केटमध्ये खळबळ

Bitcoin

Bitcoin Trading Volume : गेल्या दोन वर्षात जगभरात क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीत मोठी वाढ झाली. विशेषत: तरुणाईमध्ये आभासी चलनांचे प्रचंड आकर्षण आहे. मात्र क्रिप्टो करन्सीबाबतच्या एका अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

भारतासह अनेक देशांमध्ये कायदेशीर मान्यता नसलेल्या क्रिप्टो करन्सीच्या गुंतवणुकीवर अनिश्चिततेचे सावट गडद होण्याची शक्यता आहे. क्रिप्टो करन्सीमधील सर्वात महागडी आणि लोकप्रिय करन्सी असलेल्या बिटकॉइनच्या दैनंदिन उलाढालीबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. जगभरात बिटकॉइनमध्ये होणाऱ्या एकूण ट्रे़डिंगपैकी निम्मे व्यवहार बनावट असल्याचा गौप्यस्फोट फोर्ब्स मासिकाने केला आहे.

जागतिक घडामोडींमुळे मागील सहा महिने क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये सातत्याने घसरण झाली आहे. बिटकॉइन, इथेरियमसारख्या डिजिटल चलनांच्या किंमतीत मोठी घसरण झाली. त्यातच एका नव्या रिपोर्टमुळे आभासी चलनांच्या गुंतवणुकीला फटका बसण्याची शक्यता आहे. फोर्ब्सच्या तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार निम्म्या क्रिप्टो एक्सचेंजकडून बिटकॉइनमधील उलाढालीचे आकडे बनावट दाखवत असल्याचा दावा करण्यात आला आहे. फोर्ब्सच्या तज्ज्ञांनी 157 क्रिप्टो एक्सचेंज आणि ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचा आढावा घेतला. यातील 51% एक्सचेंजेसचा ट्रेडिंगची व्हॉल्यूम बनावट होता.

या अभ्यास गटाने 14 जून 2022 रोजी जगभरातून बिटकॉइनमधील दैनंदिन उलाढालीचा आढावा घेतला. या दिवशी बिटकॉइनमध्ये 14 बिलियन डॉलर्स इतके व्यवहार झाल्याचे निदर्शनात आले. मात्र विविध स्त्रोतातून मिळालेल्या माहितीनुसार प्रत्यक्षात त्या दिवशी बिटकॉइनमध्ये 262 बिलियन डॉलर्सची उलाढाल झाली होती.

बिटकॉइनमध्ये दररोज किती गुंतवणूक होते किंवा दररोज किती व्यवहार होतात याची नोंद घेणारी कोणतीच भरवशाची यंत्रणा सध्या अस्तित्वात नाही. त्यामुळे बिटकॉइनमधील ट्रेडिंग व्हॉल्यूमबाबत संभ्रम कायम आहे. प्रत्येक ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचे उलाढाल आकडे वेगवेगळे आहेत. उदा. कॉइनमार्केटकॅपच्या ताज्या आकडेवारीनुसार मागील 24 तासात बिटकॉइनची उलाढाल 32 बिलियन डॉलर इतकी होती. कॉइनगेकोची 27 बिलियन डॉलर, नोमिक्सवर 57 बिलियन डॉलर आणि मेसारी 5 बिलियन डॉलर असल्याचे या अहवालात म्हटलं आहे.

बिलियन डॉलर्सचे व्यवहार होतात 21 एक्सचेंजमध्ये 

जगभरातील 21 क्रिप्टो एक्सचेंज बिटकॉइनची 1 बिलियन डॉलरहून अधिक उलाढाल करत असल्याचे अभ्यासात आढळून आले. उर्वरित 33 एक्सचेंजमध्ये बिटकॉइनची उलाढाल 200 मिलियन डॉलर्स ते 999 मिलियन डॉलर्स या दरम्यान होती. बिटकॉइनचे व्यवहार सर्वाधिक होणाऱ्या एक्सचेंजमध्ये बिनान्स आघाडीवर आहे. बिनान्सचा 27% हिस्सा आहे. त्याखालोखाल एफटीएक्स आणि शिकागोचा सीएमई हे एक्सचेंज आहेत जिथे बिटकॉइनमधील डेली ट्रेडिंग व्हॉल्यूम खूप आहे.

बिटकॉइनने व्यापली आहे 40% क्रिप्टो मार्केट

  • बिटकॉइन हा सर्वात लोकप्रिय क्रिप्टो करन्सी आहे. 
  • बिटकॉइन हा सर्वात महागडा डिजिटल कॉइन आहे. 
  • आजच्या घडीला बिटकॉइनमध्ये सर्वाधिक ट्रेडिंग होते. 
  • एकूण 1 ट्रिलियन डॉलरच्या क्रिप्टो मार्केटमध्ये बिटकॉइनचा 40% हिस्सा आहे. 
  • फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढीनंतर बिटकॉइनच्या किंमतीत प्रचंड घसरण,तो 20,000 डॉलर खाली आला.
  • सध्या एका बिटकॉइनचा भाव 19,900 डॉलरच्या आसपास इतका आहे.