Crypto Fraud: सरकारने क्रिप्टो करन्सीचे व्यवहार मनी लाँड्रिग कायद्याखाली आणल्यानंतर सक्तवसुली संचालनालय (ED) इडीकडून पहिल्यांदाच मोठी कारवाई करण्यात आली. डिजिटल करन्सी व्यवहारात घोटाळा केल्याप्रकरणी 20 जणांना अटक करण्यात आली. तर 1,144 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली.
क्रिप्टो व्यवहारातून फसवणूक
केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत या कारवाईबाबत माहिती दिली. अद्यापही भारतात क्रिप्टोकरन्सी बाबत स्पष्ट कायदे आणि नियम नाहीत. त्यामुळे व्हर्च्युअल करन्सीचे व्यवहार अंदाधुंदपणे होत आहेत. यातून अनेक घोटाळे आणि फसवणुकीचे प्रकार घडतात. त्यामुळे हे व्यवहार सरकारने मनी लाँड्रिंग कायद्याखाली आणले आहेत.
WazirX क्रिप्टोला कारणे दाखवा नोटीस
फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अॅक्ट 1999 नुसार 270.18 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तर भारतातील आघाडीची क्रिप्टो एक्सचेंज कंपनी WazirX ला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. 2,790.74 कोटी रुपयांचे व्यवहार कशा प्रकारे झाले याची माहिती कंपनी आणि तिच्या संचालकाकडे मागितली आहे.
डिजिटल व्यवहारांवर FATF चे लक्ष
फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सद्वारे (FATF) क्रिप्टो व्यवहारांवर बारकाइने लक्ष ठेवण्यात येते. FATF ही जागतिक स्तरावरील आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवणारी संस्था आहे. दहशतवाद किंवा इतर बेकायदेशीर कारणांसाठी पैशांचे व्यवहार रोखण्यास ही संस्था मदत करते. इडीने हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी सखोल तपास सुरू आहे. त्यामुळे कोणतेही क्रिप्टो व्यवहार करताना सावधगिरी बाळगा.