Binance lays off: क्रिप्टो जायंट बायनान्स कंपनीने 1 हजार कर्मचारी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे क्रिप्टो इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. एक तृतीयांश कर्मचाऱ्यांना कंपनीने घरचा रस्ता दाखवला आहे. विविध क्रिप्टो करन्सीमध्ये मागील वर्षापासून पडझड सुरू आहे. त्यामुळे क्रिप्टो करन्सीचे मूल्य देखील घसरले आहे. मात्र, आता व्हर्च्युअल करन्सीचे मूल्य वाढत असल्याचे दिसून येत आहे.
मागील आठवड्यात बायनान्सच्या चीफ स्टॅटेजी ऑफिसरसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. तसेच अमेरिका सरकारने गैरव्यवहार प्रकरणी बायनान्स कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला. कंपनीने कोणताही घोटाळा केला नसल्याचा दावा केला आहे. या विरोधात न्यायालयीन लढाई लढू, असे कंपनीने म्हटले आहे.
भारतातील कर्मचाऱ्यांचीही कपात
कंपनीने ग्राहक सेवा (Customer service dept) विभागातील सर्वाधिक कर्मचाऱ्यांची कपात केली. यामध्ये भारतातील कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. सोबतच युरोप आणि अमेरिकेतल्या कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. खर्च कमी करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.
क्रिप्टो विंटर मधून कंपन्या बाहेर
2022 साली जगभरातील महत्त्वाच्या क्रिप्टो करन्सीमध्ये कमालीची घट झाली होती. गुंतवणुकीचे मूल्य नकारात्मक झाले होते. मात्र, आता क्रिप्टोकरन्सीचे मूल्य वरती जात आहे. बिटकॉइनचे मूल्य 13 महिन्यांच्या उच्चांकावर पोहचले आहे.
2022 मध्ये जगातील सर्वात मोठा क्रिप्टो एक्सचेंज FTX दिवाळखोरीत निघाला होता. चालू वर्षी मे महिन्यात Bittrex क्रिप्टो एक्सचेंजनेही सरकारकडे दिवाळखोरीचा अर्ज दाखल केला आहे. क्रिप्टो गुंतवणूकदारांचे पैसे यामुळे अडकून पडले आहेत. क्रिप्टो व्यवहारांबाबत जगभरात अद्याप ठोस कायदे नसल्याने या कंपन्यांना अनेक वेळा चौकशीला सामोरे जावे लागते.
भारतातील व्हर्च्युअल करन्सीबाबत नियम
भारतामध्ये क्रिप्टोकरन्सी व्यवहारांचा समावेश मनी लाँड्रिग कायद्यांतर्गत केला आहे. भारतातही क्रिप्टोबाबत वेगळा कायदा अस्तित्वात नाही. जी-20 चे अध्यक्षपद भारताकडे आहे. त्यामुळे क्रिप्टो करन्सीबाबत कसे कायदे असावेत, याबाबत चर्चा सुरू आहे. जागतिक कायद्यांमध्ये एकसमानता असावी, यावर भर दिला जात आहे.