केंद्रीय अर्थमंत्र्यांनी घोषणा केल्यानुसार रिझर्व्ह बँकेकडून जो डिजिटल रुपया जारी करण्यात येईल, तो ब्लॉकचेन या तंत्रज्ञानावर आधारित असेल. ब्लॉकचेनवर आधारित तंत्रज्ञानात कोणतेही गडबड-घोटाळे करता येणे शक्य नसते, असे तज्ज्ञ सांगतात. प्रत्येक व्यवहाराची नोंद कायमस्वरूपी राहते. ही वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर ब्लॉकचेन तंत्रज्ञानाबाबत जाणून घेणे आवश्यक आहे.
युरोमनी (EUROMONEY) या जागतिक पातळीवरील संस्थेच्या अहवालानुसार, ब्लॉकचेन हे कोणताही डिजिटल व्यवहार अत्यंत सुरक्षित करणारे तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने डिजिटल व्यवहार केल्यास त्यात कोणालाही हस्तक्षेप किंवा छेडछाड करता येत नाही. बिझनेस नेटवर्कमध्ये केल्या गेलेल्या मालमत्तांचे सर्व व्यवहार हे तंत्रज्ञान सुरक्षित राखते.
थोडक्यात जाणून घ्यायचे झाल्यास ब्लॉकचेन नेटवर्कमध्ये सर्व व्यवहार व्हर्च्युअली ट्रॅक केले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे या तंत्रज्ञानामुळे ऑनलाइन फसवणूक रोखणे शक्य होते. जेव्हा एखादी व्यक्ती अन्य व्यक्तीला क्रिप्टो करन्सी पाठवते, तेव्हा या व्यवहाराचा डेटा कॉम्प्युटरकडे जातो. त्याच्या माध्यमातून क्रिप्टो करन्सीत झालेला व्यवहार व्हॅलिडेट केला जातो आणि नंतर त्या व्यवहाराचा समावेश डिस्ट्रिब्युटेड लेजरमध्ये केला जातो. अशा प्रकारच्या व्यवहाराची नोंद एका ब्लॉकच्या स्वरूपात होते.
या ब्लॉकचा आकार सुमारे 1 एमबी एवढा असतो. जेव्हा एक ब्लॉक पूर्णपणे भरतो तेव्हा तो ब्लॉक करून नवीन ब्लॉक तयार केला जातो आणि नवा ब्लॉक पहिल्या ब्लॉकला जोडला जातो.
हे सर्व ब्लॉक एकमेकांशी जोडलेले असल्यामुळे त्याला ब्लॉक चेन असे म्हणतात. कोण, कुठे, केव्हा, का आणि किती यांसारखी माहिती ब्लॉक अत्यंत सूक्ष्मपणे नोंदवून घेतो आणि जतन करून ठेवतो.
या ब्लॉकची एक चेन तयार होत असल्यामुळे संपत्तीच्या चलनवलनाची माहितीसुद्धा त्याद्वारे मिळू शकते. किती रक्कम कुणाकडून कुणाला कोणत्या दिवशी किती वाजता पोहोचली, या नोंदी ब्लॉकमध्ये सेव्ह राहतात. व्यवहारांचा क्रमही या बॉक्सच्या माध्यमातून सेव्ह केला जातो.
हे ब्लॉक एकमेकांना अशा प्रकारे जोडले जातात, की अन्य कोणत्याही बॉक्सला मध्ये शिरकाव करता येत नाही. त्यामुळेच ब्लॉकचेनला मजबुती मिळते.