MSME Global Mart: जर तुमचा मध्यम किंवा लहान स्वरुपाचा व्यवसाय असेल तर ग्लोबल मार्ट पोर्टलबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल. नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज आणि MSME मंत्रालयाद्वारे ग्लोबल मार्ट हे खास पोर्टल छोट्या उद्योगांसाठी तयार करण्यात आले आहे. या पोर्टलवर खरेदी-विक्री सह इतर अनेक सुविधा उद्योगांना उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे व्यवसाय वृद्धीसाठी तुम्हाला या पोर्टलवरील नोंदणी फायद्याची ठरू शकते.
खरेदीदार आणि विक्रेते एकाच छताखाली
MSME ग्लोबल मार्टवर संभाव्य खरेदीदार आणि विक्रेते यांची संपूर्ण माहिती असून तुम्ही या पोर्टलद्वारे मालाची खरेदी-विक्री करू शकता. (MSME Global Mart registration) तसेच तुम्हाला जर कच्चा माल किंवा इतर सामुग्री खरेदी करायची असेल तर संभाव्य विक्रेत्यांशी संपर्क साधू शकता. कंपनीचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक यावर उपलब्ध आहे. तसेच तुम्ही खरेदी विक्रीसाठी कोटेशनही पाठवू शकता किंवा मागवू शकता. जगभरातील उद्योगांशी तुम्हाला याद्वारे संपर्क साधता येईल.
गो डिजिटल
मध्यम आणि लहान उद्योगांचे सहसा वेबसाइट किंवा डिजिटल पेज नसते. डिजिटल प्लॅटफॉर्मवर नसल्याने ग्राहकांशी संपर्क साधता येत नाही. मात्र, जर त्यांनी ग्लोबल मार्टसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर केला तर नक्कीच व्यवसाय वाढीस फायदा होऊ शकतो. तुमचे उत्पादन कितीही चांगले असले तरी ते जर योग्य ग्राहकांपर्यंत पोहचत नसेल तर व्यवसायात वाढ होणार नाही. ही गरज ओळखून सरकारने MSME ग्लोबल मार्ट पोर्टल सुरू केले आहे.
विविध प्रकारचे टेंडरही ऑनलाइन पाहता येतील
ग्लोबल मार्ट पोर्टलवर विविध प्रकारचे टेंडरही व्यावसायिकांना पाहता येतील. तसेच टेंडर अलर्ट लावता येतील. अंतिम मुदत, टेंडर बद्दलची सर्व माहिती पाहता येईल. विविध क्षेत्रातील उद्योग त्यांची उत्पादने आणि टेंडर पाहता येतील. जागतिक स्तरावरील टेंडरही पाहता येतील.
ग्लोबल मार्ट पोर्टलवर नोंदणीसाठी शुल्क आहे का?
ग्लोबल मार्ट पोर्टलवर उद्योगांना नोंदणी करण्यासाठी शुल्क आहे. हे शुल्क वार्षिक स्वरुपात घेतले जाते. मोफत प्लॅनमध्ये खूप कमी सुविधा पुरवल्या जातात. मात्र, वार्षिक प्लॅन जर विकत घेतला तर त्याद्वारे अनेक सुविधा उद्योगांना उपलब्ध होतात. नोंदणी करताना डिस्काउंटही दिला जातो. तसेच तीस दिवसांचा फ्री ट्रायल पिरियडही उपलब्ध आहे. या लिंकद्वारे तुम्ही पोर्टलवरील विविध फिचर्स पाहू शकता.
लहान उद्योगांना नोंदणीवर 75% डिस्काउंट
जर लहान उद्योग MSME ग्लोबल मार्ट पोर्टलवर नोंदणी करत असतील तर त्यांना 75% पर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. SC/ST आणि मायक्रो उद्योगांना 80% पर्यंत नोंदणीसाठी सबसिडी मिळू शकते.