भिशी म्हणजे काय याची आपल्या सर्वांना साधारण माहिती असेलच. भिशी म्हणजे एक असा ग्रुप किंवा समूह असतो. तो प्रत्येक महिन्याला ग्रुपमधील सर्व सदस्यांकडून एक ठराविक रक्कम जमा करतात. ही जमा झालेली रक्कम नावांच्या चिठ्ठ्या टाकून किंवा सहमतीने ठरवून प्रत्येक महिन्यात एका सदस्याला दिली जाते, याला भिशी असे म्हटले जाते. याच भिशीचा काही ग्रुपमध्ये लिलाव केला जातो. यासाठी वेगळी बोली लावली जाते. त्याला लिलाव भिशी (Lilav Bhishi) म्हटले जाते.
ग्रामीण भागात किंवा महिला, कामगार आणि व्यापाऱ्यांमध्ये भिशी हा प्रकार लोकप्रिय आहे. शहरांमधील उच्चभ्रू महिलांच्या भिशीला किटी पार्टी (Kitty Party) म्हटले जाते. भिशीचे नियम हे प्रत्येक ग्रुपनुसार ठरत असतात. भिशी या प्रकाराला सरकारची अधिकृत मान्यताही नाही. तसेच ती ग्रुपमध्ये सामंजस्याने होत असेल आणि त्यातून लोकांची फसवणूक होत नसेल तर त्याला विरोधही केला जात नाही. पण काही ठिकाणी ठरवून लिलाव भिशीच्या माध्यमातून लोकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत आहेत.
विश्वासावर चालणारा व्यवहार!
भिशीमध्ये जसा ठराविक लोकांचा समूह असतो. तसाच समूह लिलाव भिशीमध्ये ही असतो. भिशीमध्ये जे नियम वापरले जातात, ते सर्व नियम लिलाव भिशीमध्ये घेतले जातात. लिलाव भिशीमध्ये फक्त जमा झालेल्या रकमेचा म्हणजेच भिशीवर बोली लावली जाते. जो सदस्य जास्त रकमेची बोली लावतो. त्याला ती भिशी दिली जाते. काही लिलाव भिशीमध्ये व्याजसुद्धा घेतले जाते. तर काही समुहांमध्ये व्याज घेतले जात नाही. भिशी किंवा लिलाव भिशीमधील हा व्यवहार पूर्णत: विश्वासावर चालतो. त्यामुळे शक्यतो भिशी सुरू करण्यासाठी ओळखीच्या लोकांना प्रोत्साहित केले जाते.
लिलाव भिशी कशी चालवली जाते?
लिलाव भिशीमध्ये सर्वांत महत्त्वाचा आणि नियमित भिशीपेक्षा वेगळा म्हणजे लिलाव हाच आहे. या लिलावाचे ग्रुपनुसार वेगवेगळे नियम असतात. पण यातील सर्वाधिक प्रचलित असलेल्या लिलाव भिशीबद्दल आपण समजून घेऊ. लिलाव भिशीमध्ये नियमित भिशीप्रमाणे सर्व सदस्यांची रक्कम एकत्रित जमा झाली की, त्या रकमेचा लिलाव मांडला जातो. ज्याला पैशांची गरज आहे; तो त्याप्रमाणे त्या भिशीसाठी बोली लावतो. भिशीचा लिलाव जेवढ्या रकमेवर होतो. तेवढी रक्कम भिशीतून काढून घेऊन उर्वरित रक्कम बोली जिंकणाऱ्या व्यक्तीला दिली जाते. भिशीतून काढून घेतलेली बोलीची रक्कम इतर सर्व सदस्य वाटून घेतात.
लिलाव भिशीतून आर्थिक फसवणुकीच्या घटना
लिलाव भिशीतून अनेकांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत आहेत. काही भिशी चालक जाणीवपूर्वक एकाचवेळी 10 ते 12 प्रकारच्या लिलाव भिशी चालवत असतात. या भिशी ते अर्ध्यावरच बंद पाडतात आणि त्यातून जमा झालेले पैसे घेऊन फरार होतात. यात बऱ्याच लहान-मोठ्या व्यापाऱ्यांची फसवणूक झाली आहे.
प्रत्येक ग्रुपनुसार भिशीमध्ये होणारा व्यवहार हा वेगवेगळा असतो. अवघ्या काही रुपयांपासून सुरू होणारी ही लिलाव भिशी अगदी लाखो रुपयांमध्ये सुरू असते. व्यापाऱ्यांमध्ये लिलाव भिशी मोठ्या प्रमाणात चालते. यामधून जमा होणारी रक्कम कितीतरी कोटी रुपयांपर्यंत असते.