Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

भिशी हा काय प्रकार आहे?

Bhishi investment scheme

Self Help Group for Micro Financing मध्यमवर्गातील महिलांनी हौसेखातर सुरू केलेल्या भिशीने अनेकांच्या संसाराला हातभार लागला. व्यवहारज्ञानातून आणि महिलांच्या लहान-लहान गरजांमधून विकसित झालेल्या या भिशीने, आता किटी पार्टीपर्यंत (Kitty parties) चांगलीच मजल मारली आहे.

भिशी म्हणजे, एखाद्या ग्रुपमधील सदस्य प्रत्येक महिन्याला ठराविक पैसे एकत्र करून ते टप्प्याटप्प्याने सर्वांना वापरण्यासाठी दिले जातात. साधारणत: प्रत्येक महिन्याला ग्रुपमधील एका सदस्याच्या घरी किंवा त्यांनी ठरवलेल्या एका ठिकाणी जमून, पैसे गोळा करून ते एक सदस्याला दिले जातात. हा भिशी प्रकार विशेषत: महिला, कामगार आणि व्यापाऱ्यांमध्ये अधिक प्रचलित आहे.

भिशी हा काही ठराविक लोकांनी सुरू केलेला समुह असतो. जर एखाद्या भिशीच्या समुहामध्ये 20 सदस्य असतील तर सर्व सदस्यांकडून जमा केलेली रक्कम एका सदस्याला दिली जाते. तर काही वेळेस जमा केलेल्या रकमेचा लिलाव केला जातो. जो अधिक बोली लावतो. त्याला ती भिशी दिली जाते. या प्रकारात भिशीच्या रकमेवर व्याज घेतले जाते. हा व्याजदर बाजारातल्या व्याजदरापेक्षा अधिक असतो. हा संपूर्ण व्यवहार विश्वासावर चालतो. मध्यमवर्गीय किंवा लहान समुहातील भिशीमधून जमा होणारी रक्कम व्यापाऱ्यांच्या भिशीच्या तुलनेत खूपच कमी असते. 

भिशी म्हणजे...

भिशी म्हणजे बिनव्याजी गुंतवणूक
भिशी म्हणजे बिनव्याजी कर्ज
भिशी म्हणजे सहकारी पद्धतीने एकमेकांना केलेली मदत
भिशी म्हणजे समूहाने केलेले नियम आणि ती पाळण्याची जबाबदारी
भिशी म्हणजे बचत व भांडवल नियोजन

भिशी प्रकारांमध्ये घरगुती भिशीचा प्रकार खूपच लोकप्रिय आहे. यात प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम जमा केली जाते. उदाहरणार्थ ग्रुपमध्ये 10 सदस्य आहेत. तर प्रत्येक सदस्याकडून प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला 1 हजार रूपये गोळा केले जातात. जमा झालेले हे 10 हजार रूपये चिठ्ठ्या टाकून ज्या सदस्याचे चिठ्ठीत नाव येईल त्याला दिले जातात. ज्याचे नाव चिठ्ठीत येते त्याच्या नावाची चिठ्ठी पुन्हा बनवली जात नाही. पण त्याला प्रत्येक महिन्याला त्याचा 1 हजार रूपयांचा वाटा मात्र द्यावा लागतो. घरगुती भिशीप्रमाणे भिशीचे आणखीही काही वेगवेगळ्या पद्धती आहेत.

चिठ्ठी काढणे

या पद्धतीत भिशीद्वारे जमा झालेली एकत्रित रक्कम सभासदांच्या नावाच्या चिठ्ठ्या बनवून त्यातील एक चिठ्ठी लकी ड्रॉ प्रमाणे काढली जाते. चिठ्ठीत नाव असलेल्या सदस्याला ती रक्कम दिली जाते. 

लिलाव पद्धत

सर्व सभादांकडून जमा झालेल्या एकूण रकमेचा लिलाव केला जातो. ज्याची बोली सर्वाधिक असते. त्याला ती रक्कम दिली जाते. बोली जितकी लावलेली असते, तेवढी रक्कम जमा झालेल्यातून वजा करून उरलेली रक्कम संबंधित व्यक्तीला दिली जाते. आणि वजा करून घेतलेली रक्कम नफा म्हणून इतर सदस्यांमध्ये वाटून घेतली जाते.

पोट भिशी

हा प्रकार लिलाव पद्धतीप्रमाणेच असतो. फक्त यात वजा करून घेतलेली रक्कम इतर सदस्यांमध्ये वाटप करून न देता, ती एकाच सभासदाला वापरण्यासाठी दिली जाते.

किटी पार्टी म्हणजे काय? What is Kitty Party?

किटी पार्टी हे भिशीचेच इंग्रजी नाव आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. किटी पार्टीत भिशीप्रमाणेच ओळखीतले, नात्यातले किंवा शेजारी राहणारे लोक एकत्रित येऊन प्रत्येक महिन्याला काही पैसे जमा करतात आणि जमा झालेले पैसे एका सदस्याला देतात.

पण हा पैसे जमा करण्याचा आणि देण्याचा सोहळा पार पाडण्याबरोबरच लोकांच्या आग्रहानुसार यात वेगवेगळे खेळ आले. खाण्या-पिण्याच्या वस्तू आल्या, एकूणच या सोहळ्याला पार्टीचे स्वरूप येऊ लागले. कालांतराने यामधील पैसे जमा करण्याचा आणि देण्याचा भाग नगण्य ठरून त्यानिमित्ताने साजऱ्या केल्या जाणाऱ्या पार्टीचीच चर्चा अधिक होऊ लागली आहे.

भिशी किंवा किटी पार्टी याच्यातील बचत आणि त्यातून इतरांना सहकार्य करणे हे सूत्र खूप महत्त्वाचे आहे. यामुळे आर्थिक बचतीची सवय तर लागतेच पण त्याचबरोबर सामूहिक सहकार्याने मोठे भांडवल उभे राहते. ज्यातून एखाद्याची आर्थिक गरज भागू शकते किंवा तो एखादा व्यवसाय उभा करू शकतो.