Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Kitty Party: महिलांमध्ये होणाऱ्या किटी पार्टीचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का?

What is Kitty Party?

Image Source : www.pinterest.com

Kitty Party: किटी पार्टीचे नाव तुम्ही ऐकले असेलच आणि किटी पार्टी या खासकरून महिला मनोरंजनासाठी करत असतात, असेही तुम्ही ऐकले असेल. पण या किटी पार्टी फक्त मनोरंजनासाठीच होतात असे नाही. याव्यतिरिक्तही याचा वेगळा उद्देश असतो. तो आपण जाणून घेणार आहोत.

सिनेमा किंवा टीव्हीवरील मालिकांमध्ये महिलांची किटी पार्टी तुम्ही पाहिली असेल. त्यामध्ये फक्त गॉसिपिंग आणि खाण्याची-पिण्याची मस्ती चालते, असे दाखवले जाते. पण हे तितकेच खरे नाही. अशा किटी पार्टी महानगरांमध्येही होत असतात. या पार्टीचा उद्देश फक्त मनोरंजन आणि आपल्या आजूबाजूच्या घटनांबद्दल गॉसिपिंग करणे एवढाच नाही. तर अशा किटी पार्टीमधून पैसे वाचवणे हा उद्देशही असतो.

किटी पार्टी म्हणजे काय? | What is Kitty Party?

किटी पार्टी हे भिशीचेच इंग्रजी नाव आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. किटी पार्टीत भिशीप्रमाणेच ओळखीतले, नात्यातले किंवा शेजारी राहणारे लोक एकत्रित येऊन प्रत्येक महिन्याला काही पैसे जमा करतात आणि जमा झालेले पैसे एका सदस्याला देतात. 

पण हा पैसे जमा करण्याचा आणि देण्याचा सोहळा पार पाडण्याबरोबरच लोकांच्या आग्रहानुसार यात वेगवेगळे खेळ खेळले जातात. खाण्या-पिण्याच्या वस्तू आणल्या जातात. एकूणच याला पार्टीचे स्वरूप येऊ लागले आहे. आता तर यातून प्रत्येक महिन्याला पैसे जमा करण्याचा आणि ते जमा झालेले पैसे प्रत्येक महिन्याला एका सदस्याला देण्याचा भाग नगण्य ठरून त्यानिमित्ताने साजऱ्या केल्या जाणाऱ्या पार्टीचीच चर्चा अधिक होऊ लागली आहे.

मूळ उद्देश आर्थिक मदत आणि बचत | Financial Help and Saving

भिशी किंवा किटी पार्टी यामधून होणारी बचत आणि इतरांना आर्थिक मदत करणे, ही बाब खूप महत्त्वाची आहे. मुळात हाच याचा मूळ गाभा आहे. यामुळे शहरातील महिलांप्रमाणेच ग्रामीण भागातील महिलांनाही आर्थिक बचतीची सवय लागली. त्याचबरोबर सामूहिक सहकार्याने एक मोठे भांडवल उभे राहते आणि त्यातून एखाद्याची निकडीची आर्थिक गरज भासते. तसेच एखादा लघुउद्योग उभा राहू शकते. अशी अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. इतकी ताकद या भिशी आणि किटी पार्टीमध्ये आहे.

किटी पार्टीमधून पैसे वाचवले जातात! | Kitty Parties Save Money!

किटी पार्टीमधून पैसे वाचवले जातात! हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल ना! पण हे खरे आहे. कारण मुळात किटी पार्टीची सुरूवात ही पैसे कसे वाचवायचे आणि बचत कशी करायची या उद्देशानेच सुरू झाली. यामध्ये खूप सारे लोग सहभागी असतात. त्यांचा ग्रुप तयार करून प्रत्येक महिन्याला प्रत्येक सदस्याकडून पैसे जमा केले जातात. हे जमा झालेले पैसे चिठ्ठी काढून किंवा एखादा खेळ खेळून त्याद्वारे एका सदस्याला जमा झालेली रक्कम दिली जाते. या जमा झालेल्या रकमेत कोणतेही व्याज जमा केलेले नसते किंवा त्या रकमेवर कोणाला व्याज द्यावे ही लागत नाही. एकाच वेळी मोठ्या संख्येने जमा झालेली रक्कम त्या व्यक्तीला मिळते.


अशी 15 ते 20 जणांच्या ग्रुपमधून प्रत्येकाकडून किमान 2 हजार रुपये जमा केले तरी, 15 जणांचे 30 हजार रुपये जमा होतात. आणि प्रत्येक महिन्याला प्रत्येक नवीन सदस्याला एकरकमी हे 30 हजार रुपये मिळतात. या जमा झालेल्या रकमेच्या आधारे मोठ्या वस्तुंची खरेदी करता येते किंवा त्यानुसार नियोजन करून ठरवून घरातील एखादे मोठे काम या पैशातून मार्गी लागू शकते. पूर्वी अशा किटी पार्टीला पुरुषही हजेरी लावायचे. पण कालांतराने त्यात बदल होत गेला. कारण पूर्वी ही किटी पार्टी कुटुंब, नातेवाईक यापुरती सिमित होती. हळुहळू त्याची लोकप्रियता वाढल्याने यामध्ये थेट परिचय नसलेल्या व्यक्तीही सहभागू होऊ लागल्या. यामुळेच किटी पार्टीमधून पुरुषांनी काढता पाय घेतला असल्याचे बोलले जाते.

किटी पार्टी म्हणजेच भिशी का? | Kitty Party means Bhishi?

सगळीकडे परिचित असलेल्या किटी पार्टीला महाराष्ट्रात भिशी (Bhishi) म्हणून ओळखले जाते. या भिशीमध्ये पुरुषांचाही तितकाच सहभाग असतो. फक्त महिलांची भिशी तर असतेच. पण पुरुषांची ही वेगळी भिशी असते. पूर्वी किटी पार्टी ही फक्त बचत आणि एकत्रित बिनव्याजी रक्कम मिळणारी स्कीम म्हणून परिचित होती. पण आता ही किटी पार्टी शहरांमध्ये स्टेट्स सिम्बॉल बनली आहे आणि अशा किटी पार्टीमधून लाखोंची उलाढाल तर होतेच पण त्याचबरोबर महिलांचे हे खास मनोरंजनाचे ठिकाणही बनले आहे.