Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इन्कम टॅक्स आणि टीडीएसमधील फरक तुम्हाला माहित आहे का?

TDS & Income Tax

इन्कम टॅक्स आणि टीडीएस (Income Tax & TDS) या दोन्हीचा उद्देश हा टॅक्स गोळा करणे हाच असला तरी त्यांचा मार्ग मात्र वेगळा आहे. यातील फरक आपण समजून घेऊ.

इन्कम टॅक्स (Income Tax) हा बहुतांश लोकांना माहित आहे; पण टीडीएसबाबत (Tax Deduction at Source-TDS) सर्वांना माहिती असतंच असे नाही. टीडीएस आणि इन्कम टॅक्स हा एकच आहे, असे बऱ्याच जणांना वाटते. अर्थात, दोन्हीचा उद्देश हा टॅक्स गोळा करणे हाच असला तरी त्याचा मार्ग मात्र वेगळा आहे. तुम्हाला जर इन्कम टॅक्स आणि टीडीएसबाबत (Income Tax & TDS) संभ्रम असेल तर आपण यातील फरक जाणून घेऊ.

साधारणत: मार्च ते जुलै हा महिना टॅक्सचा हंगाम म्हणून ओळखला जातो. मार्च महिन्यांत करदाते (Tax Payers) नियमानुसार टॅक्स भरतात. तर जुलै महिन्यात इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतात, म्हणजेच प्राप्तीकर विवरणपत्र भरतात. एका आर्थिक वर्षात इन्कम टॅक्स विभागाने निश्चित केलेल्या टॅक्स सवलतीच्या मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न झाल्यास नियमानुसार टॅक्स भरावा लागतो. हा टॅक्स पगारदार / नोकरदार किंवा व्यावसायिक असा सर्वांनाच भरावा लागतो. त्याचबरोबर त्याला नियमितपणे इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरावे लागते. पण लोकांमध्ये इन्कम टॅक्स आणि टीडीएसवरून अनेक संभ्रम आहेत. बऱ्याच लोकांना वाटते की, इन्कम टॅक्स आणि टॅक्स डिडक्टेड अ‍ॅट सोर्स (टीडीएस) ही एकच बाब आहे. प्रत्यक्षात या दोन्ही बाबी वेगवेगळ्या आहेत.


इन्कम टॅक्स व टीडीएसमधील फरक (Difference between Income Tax & TDS)

इन्कम टॅक्स आणि टीडीएस यात मूलभूत फरक म्हणजे इन्कम टॅक्स हा एका आर्थिक वर्षातील सर्व उत्पन्नावर आकारला जातो तर टीडीएस हा प्रत्येक महिन्याच्या उत्पन्नाच्या स्रोतातून कापला जातो. इन्कम टॅक्सच्या बाबतीत नोकरदार / पगारदार व्यक्ती ही इन्कम टॅक्समधून सवलत मिळवून देणारी कागदपत्रे कंपनीकडे जमा करते आणि त्यानुसार कंपनी पगारातून टॅक्स कापून घेते. टीडीएसचा विचार केल्यास कर्मचार्‍यांना दरमहा पगार आणि विविध भत्याच्या रुपातून कंपनीकडून जी रक्कम मिळते. त्यावर कंपनी प्रत्येक महिन्याला नियमानुसार टॅक्स कापून घेते. म्हणजे एका अर्थाने टीडीएस हा आगाऊ टॅक्स म्हणून ओळखला जातो. इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर टॅक्स कपात ही अवास्तव किंवा जादा आकारली गेली असेल तर अतिरिक्त रक्कम इन्कम टॅक्स विभागाकडून रिफंड होते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला उत्पन्न दिले जाते तेव्हा त्यावर टीडीएस कापून घेतला जातो. त्याचवेळी इन्कम टॅक्स हा नंतरही भरता येतो. टॅक्स हा वार्षिकरुपात भरावा लागतो. त्याची आकारणी एका आर्थिक वर्षातील उत्पन्नाच्या आधारावर केली जाते. त्याचवेळी टीडीएस हा एका आर्थिक वर्षात आवर्ती आधारावर कापला जातो.

टीडीएस म्हणजे काय? What is TDS?

इन्कम टॅक्स अधिनियम 1961 (Income Tax Act, 1961) अनुसार टीडीएसमध्ये कपातीबाबतीचे नियम आणि अटींचे नियोजन सीबीडीटी (Central Board of Direct Taxes-CBDT)कडून केले जाते. तर टीडीएसचे व्यवस्थापन केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) करते आणि पगारावर आकारल्या गेलेल्या टॅक्समध्ये महसूल विभागाचा वाटा असतो. नियमानुसार टीडीएस कपात करणारा व्यक्ती हा डिडक्टर (Deductor) तर टॅक्स भरणार्‍या व्यक्तीला डिडक्टी (Deductee) म्हणतात.

टीडीएस कशावर आकारला जातो? How to Charged TDS? 

टीडीएस कपात हा फक्त पगार किंवा भत्त्यावरच होतो असे नाही. टीडीएस कपातीस पात्र असणार्‍या अनेक सेवा आहेत. मुदत ठेवीवरील व्याज, लाभांश, शेअरपासून मिळणारे उत्पन्न, लॉटरीत जिंकलेली रक्कम, कंत्राटदाराने भरलेले बिल, विमा विकल्यानंतर कमिशनपोटी मिळणारी रक्कम, ब्रोकरेज कमिशन, अचल मालमत्तेचे हस्तांतर करणे, भाड्याचा भरणा, बँकेतून मिळणारे व्याज, कोणत्याही कंपनीच्या संचालकाला मिळणारा लाभ यावरही टीडीएस आकारला जातो.

टीडीएस कपात न झाल्यास...

नियमांचे पालन न केल्यास टॅक्स कापून घेणार्‍यांवर दंड आकारला जाऊ शकतो. कंपनी पगार दिल्यानंतर काही दिवसांनंतर टीडीएस कपात करत असेल तर त्यास दरमहा एक टक्के आधारावर व्याज जमा करावे लागते. याशिवाय टीडीएस भरण्यावर विलंब केल्यास कंपनीला टीडीएसच्या रक्कमेवर दीड टक्कयांपर्यंत रक्कम भरावी लागते. यशिवाय टीडीएस कपात न केल्यास कंपनीला टॅक्स सवलतीचा लाभ मिळत नाही. कंपनीला प्रत्येक महिन्याला सात तारखेपर्यंत पगारातून नियमानुसार कपात केलेला टीडीएस भरावा लागतो.

टीडीएसचा क्लेम किंवा भरणा हा ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करता येतो. पण, काही जणांना ऑनलाइन फाईल करणं गरजेचं असतं. यात सर्व प्रकारच्या खासगी कंपन्या, सरकारी विभाग आणि तिमाहीत 20 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचार्‍यांचा टीडीएस कापणार्‍या कंपन्यांचा समावेश होतो.