• 02 Oct, 2022 09:17

आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड म्हणजे काय?

international mutual fund

आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड (International Mutual Fund) प्रामुख्याने इक्विटीमध्ये सेक्टरल आणि थिमॅटिक (Sectoral and Thematic Fund) प्रकारात गुंतवणूक करण्यावर भर देतात.

जे म्युचुअल (Mutual Fund) आपल्या असेट्सच्या 80 टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक परदेशातील किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील योजनांमध्ये गुंतवणूक करतात, त्यांना आंतरराष्ट्रीय फंड (International Fund) म्हटले जाते. हे फंड प्रामुख्याने इक्विटीमध्ये सेक्टरल आणि थिमॅटिक (Sectoral and Thematic Fund) प्रकारात गुंतवणूक करण्यावर भर देतात.

आंतरराष्ट्रीय फंड दोन प्रकारे कार्यरत असतात. पहिल्या प्रकारात आंतरराष्ट्रीय फंडचा मॅनेजर (International Fund Manager) भारतात राहून, आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये गुंतवणूक (Investment in International Company) करतो आणि दुसऱ्या प्रकारात फंड मॅनेजर गुंतवलेली संपूर्ण रक्कम इतर आंतरराष्ट्रीय फंडमध्ये गुंतवतात. भारतात सध्या अनेक आंतरराष्ट्रीय फंड उपलब्ध आहेत. प्रत्येक फंडाची जागतिक पातळीवरील गुंतवणुकीसंदर्भात वेगवेगळी उद्दिष्ट्ये आहेत. या उद्दिष्टांच्या आधारे, आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंडचे तीन वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण (International Mutual Fund Category) केले जाते.

थिमॅटिक इंटरनॅशनल फंड्स (Thematic International Funds)

आंतरराष्ट्रीय थिमॅटिक फंड हे देशांतर्गत थिमॅटिक म्युच्युअल फंडसारखेच असतात. जे एका थीमचा आधार घेऊन त्यात गुंतवणूक करतात. उदाहरणार्थ, एखादा थिमॅटिक फंड पायाभूत सुविधा या थीमवर आधारित आहे; तर या फंडमधील गुंतवणूक सिमेंट, पॉवर आणि स्टील कंपन्यांच्या स्टॉकमध्ये करेल. तसेच आंतरराष्ट्रीय थिमॅटिक फंड थीमशी संबंधित परदेशी कंपन्यांच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करेल.

रिजनल किंवा कंट्री स्पेसिफिक फंड (Region or Country-Specific Funds)

नावाप्रमाणेच ह फंड विशिष्ट प्रदेशाच्या किंवा विशिष्ट देशाच्या स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. जसे की, काही फंड फक्त यूएस स्टॉक मार्केट (US Stock Market)मध्ये किंवा केवळ आशियाई बाजारांमध्ये गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने तयार केलेले असतात. या स्फेसिफिक बाजारांमधून चांगला परतावा मिळावा, या हेतुने हे फंड काम करतात.

ग्लोबल मार्केट (Global Markets)

हे फंड रिजन किंवा कंट्री स्पेसिफिक फंडच्या उलट काम करतात. हे फंड जागतिक स्तरावर गुंतवणूक करतात. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये जगभरातील कंपन्यांच्या स्टॉकचा समावेश असतो. याचा अर्थ ते एकाच वेळी वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करतात. या फंडचा मुख्य उद्देश वैविध्य हा आहे.

आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे (Benefits of investment in International Mutual Fund)

भौगोलिक विविधता (Geographical Diversification)

आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत. पण, विविधीकरण हा आंतरराष्ट्रीय फंडचा सर्वात मोठा फायदा आहे. उदाहरणार्थ, जेव्हा भारतीय अर्थव्यवस्था अवघड प्रसंगातून जात असेल तेव्हा अमेरिका, ब्रिटन, चीन किंवा जपानी अर्थव्यवस्था तेजीत असू शकेल. या भौगोलिक विविधतेचा आंतरराष्ट्रीय फंडमधून फायदा मिळतो.

आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी (Opportunity to invest in international companies)

आंतरराष्ट्रीय फंडामध्ये गुंतवणूक करून, तुम्ही फेसबुक (Facebook), आदिदास (Adidas), अपल (Apple), गुगल (Google) यासारख्या जागतिक स्तरांवरील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळते. तुम्ही ज्या ब्रॅण्डच्या वस्तू विकत घेता किंवा त्यांची सेवा वापरता त्या कंपन्यांच्या मालकीमध्ये भागीदारी घेण्याची संधी अशा फंडमुळे मिळते. तसेच या कंपन्यांना होणाऱ्या फायद्यातील एक हिस्सा गुंतवणूकदार म्हणून आपल्यालाही ही मिळतो.

चलन वैविध्य (Currency Diversification)

आंतरराष्ट्रीय फंडामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला परकीय चलनातील एक्सपोजर मिळते. परकीय चलनाच्या मूल्यात झालेली वाढ किंवा रूपयाचे झालेल्या अवमूल्यनामुळे तुमच्या गुंतवणुकीवरील परतावा वाढण्याचीच शक्यता असू शकते.

आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड भौगोलिक वैविध्याबरोबरच तुम्हाला विविध परदेशी बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देतात. यामुळे जगातील प्रसिद्ध आणि प्रमुख कंपन्यांच्या मालकीमध्ये हिस्सा मिळवण्याची संधी मिळते. या अशा विविध पर्यायांसह आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड हा एक चांगला गुंतवणूक (Investment in International Mutual Fund) पर्याय ठरू शकतो.