आर्थिक शिस्त लागावी आणि बचतीचे महत्त्व कळावे यासाठी पालक आपल्या मुला-मुलींच्या नावाने बँकेत खाते सुरू करतात. यातून त्यांच्या नावे पैसा जमा करण्याची सोय उपलब्ध होते. तसेच मुलांनाही पैसे कसे साठवावेत, बँक म्हणजे काय आदींचेही आर्थिक ज्ञान मिळू शकते. 18 वर्षांहून कमी वयाच्या मुला-मुलींच्या खात्यांना मायनर अकाउंट असे म्हटले जाते. या खात्यात पैशाची बचत करुन मुलांचे शिक्षण, विवाह यासाठीची तरतूद करता येते.
कोण सुरू करु शकतो मायनर अकाउंट?
10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या नावाने पालक खाते सुरू करु शकतात. तसेच संयुक्तपणे खाते सुरू करता येते.
कायदेशीर पालक असणारी व्यक्तीही मुलांच्या नावाने हे खाते सुरू करु शकते.
खाते सुरू करण्यासाठी आपल्याला सर्वसाधारण खाते सुरू करणारा अर्ज भरावा लागतो. यात अल्पवयीन मुलाचे नाव, घराचा पत्ता, पालकांचे संपूर्ण विवरण आणि स्वाक्षरी असणे गरजेचे आहे.
आवश्यक कागदपत्रे म्हणून अल्पवयीन मुलाचा जन्माचा दाखला, केवायसी कागदपत्रे, आधार कार्डची गरज.
मूल दहा वर्षांचे होईपर्यंत हे बचत खाते पालक हाताळू शकतात; तर त्यानंतर मूल स्वत:च खाते हाताळू शकते.
अल्पवयीन खातेदारास 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपले खाते नियमित बचत खात्यात परावर्तित करावे लागते. त्यानंतर पालक ते खाते हाताळू शकत नाहीत. यासाठी अल्पवयीन मुलगा सज्ञान झाल्यानंतर त्याला केवायसीचा अर्ज देखील भरावा लागतो.
लक्षात ठेवा, अल्पवयीन मुलांच्या खात्यांच्या व्यवहारांना बँकेकडून काही मर्यादा असतात. पालकांना मात्र या खात्यातील व्यवहार करण्यासाठी अतिरिक्त सवलत दिली जाते.