बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी गेल्यानंतर आपल्याला सेव्हिंग अकाउंट (Saving Account) की करंट अकाउंट (Current Account) असा प्रश्न विचारला जातो. बचत खात्याविषयी आपल्याला माहीत असते; पण करंट अकाउंटविषयी तितकीशी माहिती नसते. करंट अकाउंट अर्थात चालू खाते हा बँक खात्याचा एक प्रकार असून तो प्रामुख्याने व्यापार-व्यवसाय-उद्योग करणार्यांसाठी आहे. आपल्या व्यवसायातील आर्थिक व्यवहारांसाठी करंट अकाउंट अत्यावश्यक आहे.
करंट किंवा चालू हे खाते उघडण्यासाठी आपल्याला शॉप अॅक्ट म्हणजेच व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र बँकेला सादर करणे गरजेचे असते. याखेरीज खाते उघडण्यासाठीचा चेक, पॅनकार्ड, संस्थेच्या कार्यालयाच्या पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट साईज फोटो द्यावे लागतात. भागीदारी फर्म असेल तर सर्व भागीदारांची कागदपत्रे सादर करावी लागतात. चालू खात्याचे अनेक फायदे असले तरी बचत खात्याप्रमाणे या खात्यातील रकमेवर व्याज दिले जात नाही. तथापि, बचत खातेधारकांना खात्यात जमा असलेल्या पैशांपेक्षा अधिक रक्कम काढण्याची सुविधा दिली जात नाही; ती चालू खात्यावर मिळू शकते. याला ओव्हरड्राफ्ट असे म्हटले जाते. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आपल्या परवानगीने ओव्हरड्राफ्टची सुविधा घेता येते.
भारतातील कुठल्याही ठिकाणाच्या नावे पे ऑर्डर, डिमांड ड्राफ्ट काढता येतो. दुसरीकडे बचत खात्यासाठी मिनिमम बॅलन्सची मर्यादा खूप कमी असते; पण चालू खात्यासाठी ती किमान 10 हजार रुपये इतकी आहे. बचत खात्यावरील चेक, एटीएम, पे ऑर्डर, डीमांड ड्राफ्ट, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग या सुविधांसाठी बहुतांश बँकांकडून शुल्क आकारले जाते. चालू खात्यासाठी या सेवा बरेचदा निःशुल्क दिल्या जातात. चालू खात्याद्वारे दिवसभरात आपण कितीही व्यवहार करु शकतो. यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागत नाही.
चालू खाते न काढता बचत खात्यातून आपण व्यवसायाशी संबंधित व्यवहार करत असाल आणि बँकेला जर ही बाब समजली तर बँक ते खाते बंद करु शकते. हल्ली चालू खात्यात काही बँकांनी प्रीमियम श्रेणी तयार केली आहे. आपले खाते जर प्रिमियम करंट अकाउंट असेल तर रोकड भरणे-जमा करणे या सुविधा आपल्याला घर किंवा व्यवसायाच्या ठिकाणीही उपलब्ध करुन दिल्या जातात. एका अर्थाने चालू खाते हे आपण व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक आहात याचा एक ढळढळीत पुरावा मानले जाते.