जागतिक लोकसंख्येने ८ बिलियनचा टप्पा पार केला असून १९५ देशांमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश होण्याकडे भारताची वाटचाल सुरू आहे. या वर्षामध्ये भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वात जास्त पॉप्युलेशन असलेला देश ठरेल. मात्र, वाढती लोकसंख्या भारतासाठी सकारात्मक ठरेल की नकारात्मक हे सरकारच्या धोरणांवरून स्पष्ट होते.
देशामध्ये ३५ वर्षांखालील तरुणांची संख्या निम्म्यापेक्षा जास्त आहे. यामध्ये वाढही होत आहे. मोठ्या संख्येने तरुण कॉलेजातून शिक्षण घेऊन बाहेर पडतात. मात्र, त्यांना रोजगार नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. मागील काही दिवसांपासून तरुणांमध्ये स्टार्टअपचे वारे वाहू लागले आहे. मात्र, तरीही त्यांची संख्या कमी आहे. तरुणांना रोजगार मिळावा यासाठी सरकारी पातळीवर निश्चित धोरणाची गरज आहे.
शिक्षण व्यवस्थेत बदल
देशामध्ये व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थाची निर्मितीची गरज आहे. फक्त शिक्षण घेवून नोकरी मिळणार नाही तर कौशल्यावर आधारित शिक्षण व्यवस्थेची गरज आहे. उद्योग व्यवसायांना ज्या कौशल्याची गरज आहे, ती कौशल्या आजच्या तरुणांना मिळायला हवेत. ग्रामीण भागातील तरुणांनाही दर्जेदार शिक्षण मिळायला हवे. भारताची ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षाखालील आहे. त्यामुळे संसाधनांचा योग्य आणि पुरेपूर वापर अत्यंत गरजेचा आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या नोकऱ्यांचे प्रमाण आणि रोजगार मिळवण्यासाठी इच्छुक तरुण यामधील तफावत कमी झाली पाहिजे. त्यासाठी रोजगार निर्मितीसाठी बजेटमध्ये ठोस उपाययोजना गरजेच्या आहेत.
सर्वात जास्त जॉब निर्मितीची क्षमता असलेली क्षेत्रे -
अर्थव्यवस्थेतील सर्वात जास्त नोकऱ्या देणारी क्षेत्रे शोधून त्यामध्ये आणखी गुंतवणूक करण्याची गरज आहे. कन्झ्युमर इंडस्ट्री, फायनान्शियल सर्व्हिसेस, बिझनेस सर्व्हिसेस, आरोग्य, सेवा, उत्पादन रिटेल आणि वाहतूक या क्षेत्रासंबंधीत कौशल्य विकास केंद्र निर्मितीची गरज आहे. त्याद्वारे तरुणांना व्होकेशनल ट्रेनिंग घेता येईल.