म्युच्युअल फंडातील (Mutual Fund) गुंतवणूक चांगला परतावा देते हे आता अनेकांना कळले आहे. या गुंतवणूकीमुळे आर्थिक शिस्त लागते हे देखील अनेकांनी अनुभवले आहे. म्हणून तर या गुंतवणूक योजनेला सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतात. दर महिन्याला ठराविक रक्कम तुमच्या बँक खात्यातून कापली जाते आणि म्युच्युअल फंडात गुंतवली जाते. परंतु कधी कधी आपल्याला आर्थिक चणचण भासते, बँक खात्यात पैसे शिल्लक नसतात आणि नेमके त्याच वेळी एसआयपीचा हप्ता कापला जाणार असतो, अशावेळी नेमके काय कराल? हप्ता चुकविल्यास गुंतवणूकदाराला दंड भरावा लागतो का? फंडावर याचा काय परिणाम होतो, हे आपण जाणून घेतले पाहिजे.
या लेखात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनचे हप्ते चुकल्यास नेमके काय होते हे आपण जाणून घेणार आहोत. एक गोष्ट मात्र लक्षात असू द्या, कुठलीही गुंतवणूक करताना आर्थिक शिस्त अत्यंत महत्वाची आहे. आर्थिक शिस्तीकडे गांभीर्याने लक्ष दिले तर कुठल्याही अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागणार नाही.
SIP मध्ये गुंतवणूक करताना तुम्हांला वेगवेगळे पर्याय दिले जातात. तुम्ही दर महिन्याला, दर तीन महिन्यांनी, दर सहा महिन्यांनी किंवा दर वर्षाला SIP चा हप्ता भरू शकता. तुमच्या आर्थिक नियोजनानुसार, गरजेनुसार तुम्ही प्लॅन निवडू शकता. पैसे भरण्यासाठी तुम्हांला ऑटो डेबिट किंवा सेल्फ पेमेंटचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. ठरलेल्या वेळी तुम्ही तुमचा गुंतवणूकीचा हप्ता भरणे आवश्यक आहे. परंतु हप्ता भरण्यासाठी तुम्हांला उशीर झाला किंवा तुम्ही पैसे भरायला विसरलात तर तुम्हांला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
रद्द होऊ शकते SIP योजना
SIP ही एक पद्धतशीरपणे केली जाणारी गुंतवणूक आहे. त्यामुळे गुंतवणूकीचे नियम पाळणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे हे विसरु नका. जर तुम्ही SIP चे एक किंवा दोन हप्ते चुकवले तर त्याचा तुमच्या फंडावर परिणाम होणार नाही. परंतु तुम्ही SIP चे सलग तीन हप्ते न भरल्यास फंड हाऊस (ज्या कंपनीला तुम्ही गुंतवणूकीसाठी पैसे दिले आहेत) तुमची एसआयपी योजना रद्द करू शकते.
तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी पैसे नसले तर तुम्ही तीन महिन्यांसाठी गुंतवणूक थांबवू देखील शकता. यासाठी किमान तीन महिने आधी तुम्हाला फंड हाऊसला कळवणे आवश्यक आहे. बँकेद्वारे जर तुम्ही गुंतवणूक केली असेल तर बँकेला 30 दिवसआधी याबाबत माहिती देणे आवश्यक आहे.
भरावा लागेल दंड
फंड हाऊसला किंवा बँकेला कल्पना देऊन तुम्ही किमान 3 महिन्यांसाठी गुंतवणूक थांबवू शकता. मात्र फंड हाऊस किंवा बँकेला कल्पना न देता जर तुम्ही हप्ता भरला नाही तर तुम्हाला दंड देखील भरावा लागू शकतो. प्रत्येक बँकांची दंडाची रक्कम ही वेगवेगळी आहे. 300-500 रुपये दंड तुम्हांला भरावा लागू शकतो.
बँक खात्यात पुरेसे पैसे ठेवा
SIP साठी ऑटो डेबिट पर्याय जर तुम्ही निवडला असेल तर ज्या दिवशी गुंतवणूकीचा हप्ता असेल तेव्हा पुरेसे पैसे बँक खात्यात राहतील याची काळजी घ्या. जर तुम्ही SIP चा हप्ता भरण्यास सक्षम नसाल तर किमान 30 दिवस आधी बँकेला तशी सूचना द्या.