इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 80D अंतर्गत आरोग्य विमा प्रीमियमवर कर सवलत देण्यात येते. या सवलतीचा लाभ स्वत:साठी, मुलांसाठी किंवा पालकांसाठी घेतलेल्या आरोग्य पॉलिसीसाठी भरलेल्या प्रीमियमवर उपलब्ध करून देण्यात आला आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण आज 'महामनी' तुम्हाला कर बचतीचा आणखी एक सोपा मार्ग सांगणार आहे. तो आहे कलम 80DDB. या अंतर्गत, तुम्ही निर्दिष्ट रोगांच्या उपचारांवर झालेल्या खर्चाचा समावेश करून कर कपातीचा लाभ घेऊ शकता. त्यासाठी कोण पात्र असेल? त्यामध्ये कोणते रोग समाविष्ट आहेत? आणि किती रकमेवर कर वजावट घेता येऊ शकते, हे जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
कलम 80DDB नक्की काय आहे?
आयकरातील कलम 80DDB अंतर्गत, तुम्ही काही गंभीर आणि दीर्घ रोगाच्या उपचारासाठी खर्च केलेल्या रकमेवर आयकर सवलत मिळवू शकता. देशातील कोणतीही व्यक्ती किंवा हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) कलम 80DDB अंतर्गत कपातीचा दावा करू शकतं. याचा अर्थ अनिवासी भारतीय (NRI) या वजावटीचा दावा करू शकत नाहीत. या वजावटीचा दावा स्वत:च्या किंवा कुटुंबातील आश्रित सदस्याच्या वैद्यकीय खर्चावर केला जाऊ शकतो. हिंदू अविभक्त कुटुंबाच्या बाबतीत, HUF च्या सदस्यासाठी दावा केला जाऊ शकतो.
कोणते रोग समाविष्ट आहेत?
यामध्ये ठराविक गंभीर आणि दीर्घ उपचार घेणाऱ्या रोगांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय काही मानसिक रोगही यामध्ये नोंदवण्यात आले आहेत.
दीर्घ आणि गंभीर आजार
- कर्करोग
- एड्स
- किडनी निकामी होणे
- हीमोफीलिया
- थेलेसेमिया
मानसिक रोग
- स्मृतिभ्रंश
- डायस्टोनिया मस्क्युलर डिफॉर्मन्स
- मोटर न्यूरॉन रोग
- अॅटॅक्सिया
- खोरिया
- हेमिबॅलिस्मस
- एफेसिया
- पार्किंसन
आवश्यक कागदपत्रे कोणती?
या कलमा अंतर्गत कर वजावटीचा दावा करण्यासाठी, त्या व्यक्तीला आवश्यक उपचार सुरू असल्याचा पुरावा सादर करावा लागेल. ज्यामध्ये प्रिस्क्रिप्शन, रोग किंवा आजाराचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. या प्रमाणपत्रावर रुग्णाचे नाव, त्याचे वय, रोग किंवा आजाराचे नाव आणि नोंदणी क्रमांकाही असणे गरजेचे आहे. हे प्रमाणपत्र सरकारी किंवा खासगी दवाखान्यातून घेता येऊ शकते.
आयकर नियम 11DD नुसार, तुम्ही खालील मुद्दे लक्षात ठेवून प्रमाणपत्र मिळवू शकता.
तुम्ही एखाद्या न्यूरोलॉजिकल आजाराचा सामना करत असाल, तर न्यूरोलॉजिस्टकडून प्रमाणपत्र घ्या, हे प्रमाणपत्र डॉक्टरेट ऑफ मेडिसिनची पदवी असलेल्या न्यूरोलॉजीस्टकडूनच घ्या.
तुम्ही घातक कर्करोगाचा सामना करत असाल, तर डॉक्टरेट ऑफ मेडिसिन आणि ऑन्कोलॉजी किंवा तत्सम पदवी असलेल्या ऑन्कोलॉजिस्टकडून प्रमाणपत्र घेतले पाहिजे.
एड्स संदर्भातील कोणतेही उपचार तुम्ही घेत असाल, तर तत्सम रोगासंदर्भातील पदवी असलेल्या डॉक्टरांकडून प्रमाणपत्र घ्या.
हेमेटोलॉजिकल डिसऑर्डरच्या संदर्भात, हेमॅटोलॉजीमध्ये डॉक्टरेट ऑफ मेडिसिन पदवी किंवा तत्सम पदवी असलेल्या डॉक्टरांनी जारी केलेले प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.
लाभास पात्र कोण?
आयकरदाता त्याचे आईवडील, मुले, भावंड आणि पत्नी यांच्या उपचारांवर खर्च केलेल्या रकमेसाठी कपातीचा दावा करता येऊ शकतो. यामध्ये गंभीर आणि दीर्घ आजाराचे रोग समाविष्ट करण्यात आले आहेत. ही वजावट घेण्यासाठी डॉक्टरांकडून प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे.
किती रकमेवर दावा केला जाऊ शकतो?
सध्याच्या आयकर नियमांनुसार, दाव्याची रक्कम व्यक्तीच्या वयावर अवलंबून असते. जर 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीवर खर्च केला जात असेल, तर 40,000 रुपयांपर्यंतच्या कपातीचा दावा केला जाऊ शकतो.
आजारी व्यक्तीचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असल्यास एक लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर कर कपातीचा दावा केला जाऊ शकतो. संस्था किंवा विमा कंपनीकडून कोणतीही प्रतिपूर्ती (Reimbursement) मिळाल्यावर, ती रक्कम दाव्यातून कमी केली जाते.