Fix Deposit : FD (Fixed Deposit) मध्ये गुंतवलेली रक्कम गुंतवणूकदाराच्या एकूण करपात्र उत्पन्नातून वजा केली जाते. कारण ते आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत येते. कर-बचत एफडी या पाच वर्षासाठी असल्याने, यामध्ये मुदतीपूर्वी पैसे काढण्याची परवानगी नाही. त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांना कमी कालावधी करीता गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी या एफडी योग्य नाहीत. तथापि, टॅक्स सेव्हिंग एफडीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काही गोष्टी माहिती करुन घेणे आवश्यक आहे.
- विश्वासार्ह आणि भक्कम आर्थिक स्थिती असलेली बँक किंवा वित्तीय संस्था निवडा.
- गुंतवणुकीपूर्वी वेगवेगळ्या बँकांनी दिलेले व्याजदर पाहा. उच्च व्याज दर असलेली बँक निवडा, जेणे करुन तुम्हाला योग्य परतावा मिळेल.
- कर बचत मुदत ठेव 5 वर्षांच्या कालावधीकरीता असते. यामध्ये मुदतीपूर्वी पैसे काढण्याची परवानगी नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी मुदतीची खात्री करा.
- आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर बचत ठेवीतील गुंतवणूक दिड लाख रुपये पर्यंतच्या कपातीसाठी पात्र असते.
- कर-बचत ठेवीवर मिळणारे व्याज करपात्र आहे. मात्र मिळालेले व्याज 40,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास टीडीएस लागू होतो.
- जर तुम्हाला भविष्यात अकस्मात पैश्यांची गरज पडली तर, मुदतपूर्व ठेवी काढल्यास लागणारा दंड आणि शुल्क एकदा नीट तपासा.
- काही बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी कर-बचत मुदत ठेवींवर जास्त व्याज देतात. जर गुंतवणूकदार अश्या लाभासाठी पात्र असेल, तर अधिका अधिक बँकेचे एफडी व्याजदर तपासून मगच गुंतवणूक करायला हवी.
- या गुंतवणूकीची नोंद ठेवा. कारण कर-बचत ठेवींवर मिळणारे व्याज फॉर्म 26AS मध्ये दिसून येणार नाही.
- गुंतवणूकदार कर बँकिंग, मोबाईल बँकिंग किंवा बँकेच्या शाखेला भेट देऊन कर-बचत ठेवींमध्ये गुंतवणूक करु शकतात.
- कर-बचत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी अटी-शर्ती योग्य प्रकारे समजून घ्या.
हे सुद्धा लक्षात ठेवा
- जर बँकेकडून टीडीएस कापला आहे; आणि गुंतवणूकदार कमी टॅक्स स्लॅबमध्ये येत असेल तर, तो गुंतवणूकदार आयटीआरद्वारे कापलेली रक्कम परत मिळवू शकतो.
- जर गुंतवणूकदार 20 आणि 30 टक्क्याच्या स्लॅबमध्ये येत असेल आणि त्याच्या गुंतवणुकीवर टीडीएस लागला असेल तर, गुंतवणूकदाराला त्यावर टॅक्स भरावा लागतो.
- बँक मुदत ठेवींवर जमा होणारे व्याज देण्यापूर्वीच टीडीएसची गणना करून घेते. त्यामुळे मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर वर्षाला टॅक्स भरला पाहिजे. यासाठी मुदत ठेवीचा कालावधी पूर्ण होण्याची वाट पाहू नये.
(डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)